हिंदु जनजागृती समितीची उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्यांकडे मागणी गोवा खबर: मागील काही वर्षांपासून गोवा राज्यात प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या आयात व विक्री यांवर शासनाने बंदी लागू केलेली असतानाही इतर राज्यांतून गोव्यात आयात केलेल्या गणेशमूर्तींची विक्री निर्बंध न पाळता सुरूच आहे. गोवा राज्य प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींपासून मुक्त करण्यासाठी शासनाने या बंदीचे प्रभावीपणे आणि तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी श्री. अंकीत यादव (आय.ए.एस्.) यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केले आले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये सौ. अनिता नाईक, मानसी चोपडेकर आणि सौ. रुक्मिणी रायकर यांची उपस्थिती होती. अशाच स्वरूपाचे एक निवेदन हिंदु जनजागृती समितीने पेडणे तालुक्याच्या उपजिल्हाधिकार्यांना दिले आहे. जिल्हाधिकारी श्री. अंकीत यादव (आय.ए.एस्.) यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दर्शवताना प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींची गोव्यात आयात होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींची विक्री होत असल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही ते पुढे म्हणाले.
हिंदु जनजागृती समितीने निवेदनात म्हटले आहे की, पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा प्रसार करणे, शाडू मातीच्या मूर्ती तयार करणार्या मूर्तिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना राबवणे, गणेशोत्सवानंतर मूर्तीचे विसर्जन वाहत्या पाण्यात व्हावे यासाठी काळजी घेणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यात प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींची आयात व विक्री यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यावरण विभाग, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, उत्पादन शुल्क विभाग, व्यावसायिक कर विभाग व पोलीस यांचा समावेश असलेल्या विशेष कृतीदलाची स्थापना करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.