गोवा खबर:राज्याच्या समृद्ध हातमाग वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या गोवा सरकारच्या वचनबद्धतेची पुष्टी करीत, गोवा सरकारच्या हस्तकला, वस्त्रोद्योग आणि काथ्याकाम खात्याने पाटो पणजी येथील संस्कृती भवनातील बहुउद्देशीय सभागृहात १२ व्या राष्ट्रीय हातमाग दिनाचा राज्यपातळीवरील सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात १९०५ च्या स्वदेशी चळवळीचे स्मरण करण्यात आले, तसेच भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करणे, रोजगार निर्मिती करणे आणि शाश्वत उपजीविकेला चालना देण्यासाठी हातमाग विणकर आणि कारागिरांच्या अमूल्य योगदानाला मान्यता देण्यात आली.
या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हातमाग उत्पादनांना आणि प्रतिष्ठित कुणबी साडीला एक वेगळी ओळख देण्यासाठी सरकार सातत्याने कार्यरत आहे असे सांगितले. त्यांनी गावांमध्ये विणकाम यंत्रसामग्रीच्या आगमनामुळे या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला आहे आणि कुणबी साडीला असलेल्या वाढत्या राष्ट्रीय मागणीवर प्रकाश टाकला. त्यांनी गोव्याच्या हातमाग वारशाला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यात आलेल्या प्रतिष्ठित पाहुण्यांना कुणबी शाली भेट दिल्या जातात. विणकरांना सरकारच्या सहकार्याचे आश्वासन देताना कुणबी उत्पादनांसाठी व्यापक बाजारपेठ जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे असे सांगून तुम्ही दर्जेदार उत्पादने तयार करा आणि सरकार तुम्हाला बाजारपेठ उपलब्ध करून देईल असे ते म्हणाले.
नाविन्यपूर्ण उपक्रम आणि जनजागृतीच्या माध्यमातून पारंपरिक हस्तकलांना प्रोत्साहन देताना, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रदर्शनाच्या स्टॉल्सना भेट दिली आणि पेडणे ते काणकोणपर्यंत गोव्याची विणकाम परंपरा जतन करणाऱ्या महिला कारागिरांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. हा उपक्रम #MyHandloomMyPride आणि #MyProductMyPride या देशव्यापी मोहिमांशी सुसंगत आहे असे त्यांनी नमूद केले. तसेच बाजारपेठेतील संबंध दृढ करणे, अस्सल हातमाग उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि गोव्याच्या विणकर समुदायासाठी अधिक संधी निर्माण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना बळकटी देतो असे ते म्हणाले.
गोव्याच्या समृद्ध विणकाम परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमात, हातमाग विणकामाचे थेट प्रात्यक्षिक, पारंपरिक ठसा छपाईचे प्रात्यक्षिक, विभागाच्या १३ हातमाग उत्पादन केंद्रांमधील आणि ३ हातमाग प्रशिक्षण केंद्रांमधील उत्पादनांचे प्रदर्शन, तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेला हातमाग फॅशन शो यांचा समावेश होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पात्र हातमाग विणकरांना माग वाटप प्रमाणपत्रे आणि मंजुरी आदेशांचे वितरणही करण्यात आले. शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून संस्कृतीचे बळकटीकरण करीत, राष्ट्रीय हातमाग दिनाच्या सोहळ्याने पारंपरिक हस्तकलांचे जतन, कारागिरांचे सक्षमीकरण आणि स्वदेशी हातमाग उत्पादनांना प्रोत्साहन देण्याप्रती गोवा सरकारची निरंतर वचनबद्धता दर्शविली. कौशल्य विकासाला चालना देऊन, बाजारपेठेच्या संधींचा विस्तार करून आणि व्यापक जनसहभागास प्रोत्साहन देऊन, गोव्याचा समृद्ध विणकाम वारसा भावी पिढ्यांसाठी जतन करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमाला हस्तकला, वस्त्र आणि काथ्याकाम खात्याचे सचिव श्री निखिल देसाई, आयएएस; हस्तकला, वस्त्र आणि काथ्याकाम खात्याचे संचालक श्री सगुण वेळीप, डीआरडीएच्या प्रकल्प संचालक श्रीमती दिपाली नाईक, हस्तकला, वस्त्र आणि काथ्याकाम खात्याच्या सहायक संचालक श्रीमती सोनिया कुंकळकर, हातमाग विणकर, कारागीर, विद्यार्थी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.