गोवा खबर

गोमंतकीय निर्माता संजय शेट्ये यांच्या ‘बंडखोर’ सिनेमाचा उद्या जागतिक प्रीमियर

Published

on

Spread the love

गोवा खबर: पिढ्यान्‌पिढ्या घराच्या चार भिंतींआड स्त्रियांनी निमूटपणे स्वीकारलेली पुरुषसत्ताक व्यवस्था, त्यातून त्यांच्या वाट्याला आलेली घुसमट आणि अखेर या मौनाचे बंडात होणारे रूपांतर अशा आशयसूत्रावर बेतलेल्या ‘बंडखोर’ या नव्या मराठी चित्रपटाचा जागतिक प्रीमियर ७ ऑगस्ट रोजी गोवा मराठी चित्रपट महोत्सवात होणार आहे. प्रसिद्ध कलासक्त गोंयकार संजय शेट्ये यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून,विशेष म्हणजे संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यात झाले असून मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटात महेश मांजरेकर यांच्यासह प्रियदर्शनी इंदालकर, छाया कदम, मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ बोडके, मंगेश देसाई, पूजा कातुर्डे, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी आणि तितीक्षा तावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘बंडखोर’च्या केंद्रस्थानी एकाच कुटुंबातील वेगवेगळ्या पिढ्यांतील सहा स्त्रियांचे जग आहे. अनेक दशके अन्याय आणि पुरुषी वर्चस्वाला आपले नशीब समजून जगलेल्या या स्त्रियांच्या आयुष्यात एका घटनेनंतर उलथापालथ होते. एका महिलेची व्यक्तिगत लढाई म्हणून सुरू होणारी गोष्ट हळूहळू अनेक वर्षे दाबल्या गेलेल्या स्त्री-आवाजाच्या सामूहिक विद्रोहात बदलते, असे चित्रपटाच्या कथासारांशातून स्पष्ट होते.

या प्रीमियर कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

गोवा बनला ‘बंडखोर’चा अवकाश

या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण गोव्यात झाले आहे. त्यामुळे गोवा हा केवळ चित्रपटाचा चित्रीकरणस्थळ म्हणून न राहता कथानकाचा भौगोलिक आणि सांस्कृतिक अवकाशही बनतो. मुख्य प्रवाहातील मराठी कलाकारांसोबत गोव्यातील कलाकारांना मिळालेली संधी हे या निर्मितीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

गोव्यातील मोहन चांदेलकर, रावी किशोर, नीती कामत, रुपेश कामत, साईश पै पोणंदीकर, सिद्धी उपाध्ये, उदय म्हांबरे, शर्व शेट्ये, अंकिता सावंत या कलाकारांनी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे गोव्यात चित्रित झालेल्या या मराठी चित्रपटाशी स्थानिक चित्रपट आणि नाट्यविश्वाचेही नाते जोडले गेले आहे.

७ ऑगस्टला पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर

चित्रपटाचा पहिलाच शो गोव्यात होत असल्याने यंदाच्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवातील प्रमुख आकर्षणांपैकी ‘बंडखोर’ एक असणार आहे. ७ ऑगस्ट रोजी जागतिक प्रीमियर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार असून, यावेळी गोवा मनोरंजन सोसायटीच्या उपाध्यक्षा दिलायला लोबो, पणजीचे महापौर रोहित मॉन्सेरात यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. चित्रपटाशी संबंधित कलाकार आणि तंत्रज्ञही या वेळी उपस्थित राहणार आहेत.

Trending

Exit mobile version