गोवा खबर: एअर इंडियाच्या AI2379 (फुकेत–दिल्ली) या विमानाला मंगळवारी उड्डाणादरम्यान हवेच्या दाबातील बदलामुळे (एअर टर्ब्युलन्स) जोरदार हादरे बसल्याची घटना घडली. मात्र, वैमानिकांनी प्रसंगावधान राखत विमान सुरक्षितपणे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवले. या घटनेनंतर ८ प्रवासी आणि ४ केबिन क्रू सदस्यांना सविस्तर वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाने दिली.
मंत्रालयाच्या माहितीनुसार, एअरबस A320 (नोंदणी क्रमांक VT-EXO) हे विमान फुकेतहून दिल्लीकडे येत असताना उड्डाणादरम्यान अचानक टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. काही वेळातच विमान स्थिर करण्यात आले आणि कोणत्याही अतिरिक्त अडचणीशिवाय सुरक्षित लँडिंग करण्यात आले.
या विमानात ३ बालकांसह १३७ प्रवासी प्रवास करत होते. तसेच २ वैमानिक आणि ६ केबिन क्रू सदस्य, असे एकूण ८ कर्मचारी विमानात होते.
विमान दिल्लीत उतरताच वैद्यकीय पथकांनी सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून ८ प्रवासी आणि ४ केबिन क्रू सदस्यांना फोर्टिस आणि मेदान्ता रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित प्रवाशांनाही आवश्यक ती मदत आणि सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले.
दरम्यान, नागरी उड्डाण मंत्र्यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव आणि DGCA महासंचालकांसह फोर्टिस रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली आणि आवश्यक त्या सर्व मदतीचे आश्वासन दिले. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारीही रुग्णालय प्रशासन आणि एअर इंडियाशी समन्वय साधून उपचारांवर लक्ष ठेवून आहेत.
घटनेनंतर संबंधित विमान हँगरमध्ये हलविण्यात आले असून, त्याचा फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) सुरक्षित करण्यात आला आहे. DGCA ने या घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून, नागरी उड्डाण मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असून, या घटनेबाबत सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.