गोवा खबर

हंसापूर (पेडणे) येथे ५४ व्या संस्कार वर्गाचे उत्साहात उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : आषाढ कृष्ण चतुर्थीच्या पवित्र शुभमुहूर्तावर हंसापूर येथे संख्येच्या दृष्टीने ५४ व्या संस्कार वर्गाचे उद्घाटन उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. भारतीय संस्कृती, नैतिक मूल्ये, राष्ट्रभक्ती आणि चारित्र्य संवर्धनाची जपणूक करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या संस्कार वर्गाच्या उद्घाटन सोहळ्यास विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय परंपरेनुसार भारतमाता पूजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना विश्व हिंदू परिषद आणि मातृछाया संस्थेच्या विविध सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रहिताच्या उपक्रमांची थोडक्यात माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या श्लोक पठण करून कार्यक्रमात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले.

या प्रसंगी एका विद्यार्थ्याचा वाढदिवस भारतीय संस्कृतीनुसार अत्यंत साधेपणाने आणि आदर्श पद्धतीने साजरा करण्यात आला. वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे किंवा मेणबत्त्या विझवणे नव्हे, तर माता-पित्यांचा आशीर्वाद घेणे, देवपूजन करणे आणि समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हीच खरी भारतीय परंपरा असल्याचे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कारांची जाणीव अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी श्री. प्रमोदभाई सांगोडकर यांनी मनोगत व्यक्त करत संस्कार वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी होत असलेल्या कार्याचे कौतुक केले. प्रखंड अध्यक्ष श्री. प्रकाशजी मळीक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संस्कार वर्गांचे उद्दिष्ट, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामधील त्यांचे महत्त्व, भारतीय संस्कृतीचे जतन, सामाजिक बांधिलकी, शिस्त, नैतिक मूल्ये आणि राष्ट्रभक्तीची भावना बालवयापासून रुजविण्याची गरज यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

या संस्कार वर्गाचे आचार्य म्हणून श्री. राजारामजी मळीक कार्यभार सांभाळणार असून ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. तसेच निवृत्त अध्यापक श्री. सखारामजी देसाई हे सह-आचार्य म्हणून विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. श्री. सुहासजी मलिक, सेवा आयामाच्या जिल्हा समितीचे सदस्य, हे या संस्कार वर्गाचे कार्यकर्ते म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.

उद्घाटन सोहळ्यास पालकांसह एकूण १६ विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी संस्कार वर्गाच्या या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कार, संस्कृती, चारित्र्य, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रभक्तीची मूल्ये आत्मसात करून आदर्श नागरिक बनावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. उपस्थितांनी या उपक्रमासाठी आयोजकांचे अभिनंदन करून संस्कार वर्गाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Trending

Exit mobile version