गोवा खबर

विकासही आणि वारसाही या संकल्पनेतून गोव्याचा विकास: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Published

on

Spread the love

गोवा खबर: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘गोवन आर्किटेक्चर अँड सस्टेनेबिलिटी’ या राष्ट्रीय परिषदेत बोलताना, गोवा केवळ ऐतिहासिक वारसा जपत नसून पारंपरिक वास्तुकलेचे जतन आणि आधुनिक विकास यांचा समतोल साधत असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली “विकासही आणि वारसाही” ही संकल्पना भारताच्या विकासाचा पाया आहे. आधुनिक पायाभूत सुविधा उभारताना राज्याची ओळख आणि परंपरा जपणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोव्यातील पारंपरिक वास्तुकला ही हवामानाशी सुसंगत असल्याचे सांगत त्यांनी लेटराइट दगड, चुन्याचे प्लास्टर, मंगळूर कौले आणि अंगणयुक्त घरे ही केवळ वास्तुरचना नसून पर्यावरणपूरक आणि वैज्ञानिक पद्धती असल्याचे नमूद केले.

राज्य सरकार गोवा हेरिटेज पॉलिसी अंतर्गत चापोरा, कोरजुए, साखळी आणि कोलवाळ येथील किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच चांदोरसारख्या वारसा गावांचा विकास, मंदिर वारसा प्रकल्प आणि जीआयएस मॅपिंग, लेझर स्कॅनिंग व डिजिटल इन्व्हेंटरीद्वारे ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की, राज्यातील नव्याने उभारल्या जाणाऱ्या सर्व सरकारी इमारतींमध्ये पॅसिव्ह कूलिंग, नैसर्गिक प्रकाश, पावसाचे पाणी साठवण, सौरऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान अनिवार्यपणे समाविष्ट केले जाईल. या इमारती आधुनिक असल्या तरी त्यामध्ये पारंपरिक गोमंतकीय वास्तुशैली जपली जाईल.

डॉ. सावंत यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग (BIM), ड्रोन तंत्रज्ञान आणि जीआयएस मॅपिंग यांसारखी आधुनिक साधने वारसा जतनासाठी महत्त्वाची ठरत असल्याचे सांगितले.

भाषणाच्या शेवटी त्यांनी ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेसह ‘विकसित गोवा’ घडवण्यासाठी वास्तुविशारद, तज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

Trending

Exit mobile version