गोवा खबर

पणजी येथे ‘आयएमपीसीसी’ची बैठक : सरकारी उपक्रमांच्या प्रभावी प्रसारासाठी समन्वयाचे आवाहन

Published

on

Spread the love

गोवा खबर : सरकारी विभाग आणि माध्यम संस्थांमधील परस्पर संवाद व जनसंपर्क अधिक मजबूत करण्यासाठी पत्र सूचना कार्यालय (पीआयबी गोवा) द्वारे पणजी येथील कार्यालयात आंतरमाध्यम प्रसिद्धी समन्वय समितीची (आयएमपीसीसी) बैठक आयोजित करण्यात आली होती. पीआयबी पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस केंद्र सरकारचे विविध विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि गोवा सरकारच्या माहिती व प्रसिद्धी संचालनालयाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत बोलताना स्मिता वत्स शर्मा यांनी सरकारी योजना आणि उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी पीआयबी, दूरदर्शन, आकाशवाणी यांसारख्या माध्यम यंत्रणा आणि इतर सरकारी विभागांमध्ये उत्तम समन्वय असणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. पीआयबी फॅक्ट चेक युनिटच्या मदतीने चुकीच्या बातम्या आणि माहितीचे खंडन करून जनतेमधील गैरसमज दूर करण्यासाठी हे व्यासपीठ अधिक भक्कम केले जाऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

पीआयबी गोवाचे संचालक नाना मेश्राम यांनी उपस्थितांचे स्वागत करताना सांगितले की, अनेक विभागांचे उल्लेखनीय कार्य योग्य प्रसिद्धीअभावी लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे सर्व सदस्यांनी या सामायिक व्यासपीठाचा वापर करून आपल्या उपक्रमांची माहिती नियमितपणे माध्यमांपर्यंत पोहोचवावी. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा बहुआयामी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आयएमपीसीसी हे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र ठरत आहे.

Trending

Exit mobile version