गोवा खबर

मुख्यमंत्र्यांहस्ते नवीन ऑपरेशन थियेटर आणि लेझर व्हेन उपचार सुविधेचे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली येथील सामाजिक आरोग्य केंद्रात अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ऑपरेशन थिएटर आणि लेझर व्हेन उपचार सुविधेचे उद्घाटन केले. अत्याधुनिक उपचार अधिक सुलभ करून राज्यातील विशेष आरोग्यसेवा उपलब्ध करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

सामाजिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवा पायाभूत सुविधा बळकट करीत  नव्याने बांधलेल्या ऑपरेशन थियेटर कक्ष संकुलामुळे शस्त्रक्रिया सेवांमध्ये वाढ होईल आणि या भागातील रुग्णांची दर्जेदार उपचारांची सुविधा सुधारणार. विशेष आरोग्य सेवांचा आणखी विस्तार करीत सामाजिक आरोग्य केंद्राने व्हेरिकोज व्हेन्सने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी मोफत इंटरव्हेन्शनल लेझर व्हेन उपचार सुरू केले आहेत. ही सेवा विनामूल्य उपलब्ध असेल. याचा फायदा पेडणे ते काणकोण पर्यंतच्या रुग्णांना होईल.

या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील प्रत्येक नागरिकासाठी दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा सुलभ आणि परवडणारी करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. श्री सावंत यांनी आरोग्य मंत्री श्री विश्वजित राणे आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर इंटरव्हेन्शनल लेझर व्हेन ट्रीटमेंट सुविधा सुरू करण्यात आली आणि त्यानंतर आवश्यक उपकरणे खरेदी करण्यात आली. या उपक्रमामुळे गोव्यातील लोकांना परवडणारे अत्याधुनिक उपचार घेणे शक्य होईल असे ते म्हणाले.

निरोगी आरोग्यसेवा आणि आर्थिक संरक्षणावर भर देत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नागरिकांना नियमित योगाभ्यास आणि निरोगी जीवनशैलीद्वारे आपल्या आरोग्याला प्राधान्य देण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी सरकार दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेद्वारे वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत देत असून, या योजनेखाली जवळपास ७० कोटी रुपये खर्च केले जात आहेत असे सांगितले. अधिकाधिक रुग्णांना प्रधानमंत्री मदत निधी अंतर्गत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ज्यामुळे अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांना अतिरिक्त साहाय्य मिळेल असेही ते म्हणाले.

अधिक निरोगी गोवा घडविण्याच्या सरकारच्या आरोग्यसेवा सुविधा मजबूत करणे, विशेष वैद्यकीय सेवांचा विस्तार करणे आणि दर्जेदार उपचार सर्वांना समान उपलब्ध करण्यास प्राधान्य दिले आहे. प्रगत तंत्रज्ञानाला रुग्ण-केंद्रित सेवे सोबत जोडून, प्रत्येक नागरिकाला सुलभ, परवडणारी आणि आधुनिक आरोग्यसेवा देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

या कार्यक्रमाला डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार श्री प्रेमेंद्र शेट, आरोग्य सेवा संचालक डॉ. रूपा नाईक, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश मडकईकर, सल्लागार रेडिओलॉजिस्ट आणि इंटरव्हेंशनल लेझर व्हेन स्पेशालिस्ट डॉ. राजाराम महाम्ब्रे, आरोग्य अधिकारी डॉ. सिद्धी एस. कांसार, डॉक्टर, इतर डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, पंचायत सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Trending

Exit mobile version