कमी दंड, जलद निपटारा आणि प्रलंबित पीएफ वाद मिटविण्याची संधी
गोवा खबर : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ), प्रादेशिक कार्यालय, गोवा यांनी राज्यातील सर्व नियोक्त्यांना ‘विश्वास 2026 ‘ या विशेष योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. कामगार व रोजगार मंत्रालयाने सुरू केलेली ही एकदाच उपलब्ध होणारी योजना प्रलंबित पीएफ दंडाशी संबंधित वाद सामोपचाराने निकाली काढण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
29 जून 2026 पासून लागू झालेली ही योजना सहा महिन्यांसाठी उपलब्ध असून, पात्र आस्थापनांना कमी दराने दंड भरून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची संधी उपलब्ध करून देते.
या योजनेअंतर्गत न्यायालयीन वाद सुरू असलेली प्रकरणे, वसुली प्रलंबित असलेली अंतिम आदेशाची प्रकरणे तसेच नोटीस जारी झालेली किंवा अद्याप जारी न झालेली पूर्व-निर्णय (Pre-adjudication) प्रकरणे समाविष्ट करण्यात आली आहेत.
योजनेचा लाभ घेणाऱ्या आस्थापनांना दंडामध्ये मोठी सवलत मिळणार असून, दीर्घकाळ चालणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेपासूनही दिलासा मिळणार आहे. यशस्वी सेटलमेंटनंतर संबंधित नियोक्त्यांना डिजिटल ‘विश्वास प्रमाणपत्र’ प्रदान करण्यात येणार आहे.
पात्र नियोक्ते ईपीएफओच्या Employer Portal वर डिजिटल स्वाक्षरी किंवा ई-साईनद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. आवश्यक व्याजाची रक्कम भरून इतर अटी पूर्ण केल्यानंतर अर्जावर कार्यवाही केली जाईल.
ईपीएफओ प्रादेशिक कार्यालय, गोवा यांनी राज्यातील सर्व पात्र नियोक्त्यांना या मर्यादित कालावधीच्या योजनेचा लाभ घेऊन प्रलंबित वाद मिटवावेत, आर्थिक भार कमी करावा आणि पीएफ नियमांचे पालन सुनिश्चित करावे, असे आवाहन केले आहे.