गोवा खबर : पर्यटन मंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी आज ₹१५० कोटी खर्चाच्या ‘अमठाणे पंप हाऊस’ आणि ‘अमठाणे ते कुंचेलीम १५० एमएलडी (MLD) कच्चे पाणी वहन योजने’चे (Raw Water Conveyance Scheme) कार्यान्वयन झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे पर्वरी, असनोरा आणि पिलेर्ण येथील जलशुद्धीकरण प्रकल्पांना वर्षभर (३६५ दिवस) कच्च्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित होणार आहे.
‘तिलारी कालव्या’च्या वार्षिक देखभाल-दुरुस्तीच्या काळात कच्च्या पाण्याच्या पुरवठ्यात निर्माण होणारा हंगामी व्यत्यय दूर करून हा प्रकल्प या भागातील नागरिकांना वर्षभर विश्वासार्ह आणि अखंड पाणीपुरवठा उपलब्ध करून देणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले असून तो तात्काळ कार्यान्वित करण्यात आला आहे.
उद्घाटन समारंभाला इतर मान्यवरांसह उपस्थित असलेल्या रोहन खंवटे यांनी यावेळी सांगितले, “वर्षानुवर्षे पर्वरी आणि उत्तर गोव्यातील काही भाग कच्च्या पाण्यासाठी तिलारी कालव्यावर अवलंबून होते. दरवर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात तिलारी कालवा वार्षिक देखभाल-दुरुस्तीसाठी बंद करण्यात येत असल्याने नागरिकांना अनेकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागत असे. विशेष म्हणजे हा कालावधी दिवाळी, ख्रिसमस आणि नववर्ष या सणांचा असल्यामुळे या भागात पाण्याची मागणी लक्षणीयरीत्या वाढत असे. अमठाणे पंप हाऊस आणि कच्चे पाणी वहन योजना कार्यान्वित झाल्यामुळे आता पर्वरी, असनोरा आणि पिलेर्ण येथील जलशुद्धीकरण प्रकल्पांना वर्षभर कच्च्या पाण्याचा पुरवठा होणार असून नागरिकांना ३६५ दिवस विश्वासार्ह पाणी उपलब्ध होईल. आपल्या नागरिकांची जलसुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या तसेच वाढत्या लोकसंख्येच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”
ते पुढे म्हणाले, “हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकार करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, जलसंपदा मंत्री श्री. सुभाष ए. शिरोडकर, गोवा सरकार तसेच अथक परिश्रम घेणारे सर्व अभियंते आणि अधिकारी यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. गोव्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि आवश्यक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही यापुढेही एकत्रितपणे कार्य करत राहू.”
आमठाणे पंप हाऊस आणि उच्च क्षमतेच्या पारेषण वाहिनीच्या कार्यान्वयनामुळे प्रमुख जलशुद्धीकरण प्रकल्पांपर्यंत कच्च्या पाण्याची वाहतूक अधिक कार्यक्षम होणार आहे. त्यामुळे उत्तर गोव्यातील पिण्याच्या पाण्याच्या वितरण व्यवस्थेला अधिक बळ मिळणार असून भविष्यातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त क्षमताही निर्माण होणार आहे.
आमठाणे धरण हे पर्वरी तसेच संपूर्ण बार्देश तालुक्यासह उत्तर गोव्यासाठी कच्च्या पाण्याचा महत्त्वाचा पर्यायी स्रोत आहे. मुख्य तिलारी कालवा प्रणालीमध्ये कोणताही व्यत्यय निर्माण झाल्यास हे धरण पाणीपुरवठ्याला पूरक ठरते. आमठाणे धरणातील कच्चे पाणी असनोरा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पासह विविध प्रकल्पांकडे वळविण्यात येते, जेथून स्थानिक जलाशयांना पाणीपुरवठा केला जातो.
या प्रकल्पात चार उच्च क्षमतेचे उभे टर्बाइन पंप बसविण्यात आले आहेत. त्यापैकी दोन पंप सतत कार्यरत राहतील, तर उर्वरित दोन पंप आपत्कालीन राखीव म्हणून पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्य जलशुद्धीकरण प्रकल्पांवर अचानक ताण निर्माण झाल्यास किंवा हंगामी काळात पाण्याची मागणी वाढल्यास प्रणाली तात्काळ कार्यान्वित होऊन अखंड पाणीपुरवठा सुनिश्चित केला जाईल.