गोवा खबर : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा गोवा मराठी चित्रपट महोत्सव यंदा १५ व्या वर्षात पदार्पण करत असून, ७ ते ९ ऑगस्टदरम्यान पणजीतील आयनॉक्स (INOX) आणि मॅकेनिज पॅलेस येथे हा महोत्सव रंगणार आहे. विन्सन वर्ल्डतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवाने गेल्या दीड दशकात गोव्यातील महत्त्वाच्या सांस्कृतिक व्यासपीठांपैकी एक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नवोदित आणि प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांना एकत्र आणण्याबरोबरच जागतिक स्तरावर गाजलेल्या चित्रपटांचा आस्वाद रसिकांना देण्याचे काम या महोत्सवाने सातत्याने केले आहे.
यंदाच्या महोत्सवासाठीची नोंदणी सुरू झाली असून ती बुर्रा अॅप आणि संकेतस्थळावर ऑनलाइन करता येणार आहे. तसेच पणजीतील फॉन्टेइनास येथील आंगण रेस्टॉरंट, वास्कोतील हॉटेल अनंताश्रमजवळील विन्सन ग्राफिक्स, मडगावमधील इसिडोरिओ बाप्टिस्ता रोडवरील माया बुकस्टोअर आणि फोंड्यातील नूतन फार्मसीजवळील मुग्धा बोरकर येथे प्रत्यक्ष नोंदणीची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
यंदाच्या महोत्सवात चार उत्तम चित्रपटांचे जागतिक प्रीमियर होणार आहेत. यामध्ये महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘बंडखोर’, गजेंद्र अहिरे यांचा ‘पिशवी’, शिवाजी पाटील दिग्दर्शित ‘आकडा’ आणि निलेश नाईक यांचा ‘द्विधा’ यांचा समावेश आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला रोहन कनवाडे दिग्दर्शित ‘साबर बोंड’ हा चित्रपटही महोत्सवात प्रदर्शित होणार आहे. सनडान्स चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होऊन वर्ल्ड सिनेमा ड्रॅमॅटिक ग्रँड ज्युरी पुरस्कार पटकावणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे.
याशिवाय ‘क्रांतीज्योती विद्यालय’, ‘उत्तर’, ‘फस्सक्लास दाभाडे’, ‘तिघी’, ‘तू, ती आणि फुजी’, ‘तुंबाडची मंजुळा’, ‘मर्दिनी’, ‘भुतं भयम्’ आणि ‘अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई’ यांसारखे विविध विषयांवरील चित्रपटही रसिकांना पाहता येणार आहेत. कौटुंबिक नाट्य, सामाजिक आशय, विनोद, स्त्रीकेंद्री कथा आणि मानवी नातेसंबंध अशा विविध विषयांवरील चित्रपटांचा समावेश यंदाच्या महोत्सवात करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते शुभारंभ
महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार असून, यावेळी महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित आणि विन्सन ग्राफिक प्रॉडक्शन निर्मित ‘बंडखोर’ने महोत्सवाचा आरंभ होणार आहे. या चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरला चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित राहणार आहे. प्रियदर्शनी इंदालकर, छाया कदम, मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ बोडके यांच्यासह विविध गोमंतकीय कलाकारांनी भूमिका साकारलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यात झाले असून महिला सक्षमीकरण हा त्याचा मध्यवर्ती विषय आहे.
मोहन जोशी ‘कृतज्ञता पुरस्कारा’चे मानकरी
यंदाच्या महोत्सवात सचिन खेडेकर, रेणुका शहाणे, मृणाल कुलकर्णी, छाया कदम, सिद्धार्थ चांदेकर, सिद्धार्थ जाधव, किशोर कदम, जितेंद्र जोशी, ललित प्रभाकर, निर्मिती सावंत, सुबोध भावे, सई मांजरेकर, प्रियदर्शन जाधव, भूषण प्रधान, मानसी कुलकर्णी, प्रार्थना बेहरे, नेहा पेंडसे आणि मृण्मयी गोडबोले यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा ‘कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या चित्रपट व रंगभूमीवरील दीर्घ योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे.