गोवा खबर

मोपा येथे ASDC चा प्रमाणपत्र वितरण व सन्मान सोहळा

Published

on

Spread the love

गोवा खबर : एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर (ASDC), मोपा (पेडणे) येथे विविध व्यावसायिक कोर्सेस यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण आणि सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास दोडामार्ग इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संजय पाटील, ‘साने गुरुजी सेवाव्रत पुरस्कार’ प्राप्त शिक्षक अनिल मांगले मानद उपस्थित होते.

पारंपरिक दीपप्रज्वलनाने सोहळ्याची सुरुवात झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष नागरी सत्कार करण्यात आला. त्यानंतर यशस्वी प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. शिक्षण हा भविष्याचा खरा पासपोर्ट असून विद्यार्थ्यांनी या कौशल्यांच्या आधारे स्वतःचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे, असा संदेश प्राचार्य संजय पाटील यांनी दिला.

ASDC चे सेंटर हेड संज्योत संकपाळ यांनी प्रास्ताविक करताना स्थानिक तरुणांना एव्हिएशन व टेक्निकल क्षेत्रात मोफत आणि दर्जेदार रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन सक्षम बनवण्याचा संस्थेचा मानस व्यक्त केला. या सोहळ्यास शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन प्रशिक्षक अमित गुरव यांनी केले.

Trending

Exit mobile version