गोवा खबर

म्हापशातील सुनील पाटील यांची हिमालयात थरारक २,७०० किमी लडाख बाइक मोहीम यशस्वी

Published

on

Spread the love

गोवा खबर : म्हापसा येथील सुनील पाटील यांनी हिमालयातील अत्यंत कठीण आणि रोमांचक अशा लडाख बाइक मोहिमेचे स्वप्न यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. तब्बल १२ दिवसांत २,७०० किलोमीटरचा प्रवास करत त्यांनी हिमालयातील जगप्रसिद्ध उंच पर्वतीय रस्ते, दुर्गम दऱ्या आणि नयनरम्य सरोवरांचा थरारक अनुभव घेतला.

या साहसी मोहिमेची सुरुवात मनाली येथून झाली होती. त्यानंतर त्यांनी जिस्पा, शिंकुला पास, पदुम, झंस्कार व्हॅली, कारगिल, मॅग्नेटिक हिल, लेह, खारदुंगला, नुब्रा व्हॅली, पँगाँग लेक, हानले, उमलिंग ला आणि त्सो मोरीरी लेक असा अतिदुर्गम प्रवास पूर्ण केला. हा संपूर्ण खडतर मार्ग पार करून ते पुन्हा मनाली येथे सुखरूप परतले आणि त्यांनी आपल्या मोहिमेची यशस्वी सांगता केली.

या प्रवासादरम्यान सुनील पाटील यांनी एक मोठा टप्पा गाठला. जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुमारे १९,०२४ फूट उंचीवरील उमलिंग ला पासवर त्यांनी भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला आणि राष्ट्रध्वजाला सलाम करत एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.

अत्यल्प ऑक्सिजन, कडाक्याची थंडी, सातत्याने बदलणारे प्रतिकूल हवामान आणि अत्यंत खडतर रस्ते अशा अनेक आव्हानांचा सामना करत त्यांनी ही मोहीम फत्ते केली. हा प्रवास केवळ एक पर्यटन नव्हता, तर आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटीची ती खरी परीक्षा होती, अशा भावना सुनील पाटील यांनी मोहीम फत्ते केल्यानंतर व्यक्त केल्या. म्हापसा परिसरातून त्यांच्या या अद्वितीय कामगिरीबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Trending

Exit mobile version