गोवा खबर

पुराभिलेख खात्यातर्फे मोडी-मराठी कार्यशाळा

Published

on

Spread the love

एकाच वेळी पेडणे महाविद्यालय व गोवा विद्यापीठात आयोजन

गोवा खबर:राज्य सरकारच्या पुराभिलेख खात्यातर्फे मोडी लिपी शिकणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. येत्या २० जुलै ते ३० जुलै अशी दहा दिवशीय ही कार्यशाळा असणार असून एकाचवेळी दोन ठिकाणी पार पडणार. पुराभिलेख खाते व पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने याच महाविद्यालयात सकाळच्या सत्रात कार्यशाळा होणार आहे. तर दुसरी कार्यशाळा याच दहा दिवसांत दुपारच्या सत्रात गोवा विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेची वेळ सकाळी १०.३० वा. ते ०१.०० वा. (पेडणे महाविद्यालय) व दुपारी २.३० वा. ते संध्या. ०५.०० (गोवा विद्यापीठ) अशी असणार आहे.

पुणे येथील मोडी लिपी तज्ञ डॉ. श्री. गिरीश मांडके यांना या दोन्ही कार्यशाळेंसाठी मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले असून त्यांचा या क्षेत्रातील दिर्घ अनुभव व सखोल अभ्यास याचा गोमंतकीयांना लाभ मिळावा हाच उद्देश पुराभिलेख खात्याचा आहे. गिरीश मांडके यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास पुण्यातील विख्यात डेक्कन महाविद्यालय येथून त्यांनी पी. एच.डी. संपादित केली असून मोडी प्रशिक्षक म्हणून २०१० पासून ते कार्यरत आहेत. अनेक मोडी कार्यशाळांमध्ये त्यांनी हजारो प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले आहे. गोव्यात झालेल्या तीन कार्यशाळांमध्ये त्यांनी यापुर्वी योगदान दिले असून अनेक विद्यार्थी तसेच अन्य प्रशिक्षणार्थी मोडी अभ्यासक म्हणून घडत आहेत.

या कार्यशाळेसाठी सोपा अभ्यासक्रम नेमून दिला असला तरी १० दिवसांमध्ये मोडीचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करता येणार आहे. मोडी लिपीतील अक्षर ओळख, स्वर व व्यंजने, बाराखडी,  शब्दतोड तसेच शेवटी ऐतिहासिक दस्तावेज वाचणे अशी रुपरेषा या कार्यशाळेतील अभ्यासक्रमाची असेल. सदर कार्यशाळेत पुर्णपणे मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नसल्याची माहिती पुराभिलेख खात्याचे संचालक श्री. बालाजी शेणवी यांनी दिली. गोवा सरकार प्रायोजित या ३० तासांच्या प्रशिक्षणाचा लाभ गोमंतकियांनी घ्यावा असे आवाहन खात्यातर्फे करण्यात आले आहे.  

Trending

Exit mobile version