गोवा खबर

तरुणांनी शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री  दिगंबर कामत

Published

on

Spread the love

केंद्रीय किनारी शेती संशोधन संस्था (सीसीएआरआय), गोवा येथे 98 व्या आयसीएआर  स्थापना दिनाचा सोहळा साजरा


गोवा खबर:भारतीय कृषी संशोधन परिषदेची केंद्रीय किनारी शेती संशोधन संस्था (आयसीएआर-सीसीएआरआय), गोवा यांनी आज 16 जुलै रोजी जुन्या गोव्यातील आपल्या प्रांगणात भारतीय कृषी संशोधन परिषदेचा (आयसीएआर) 98 वा स्थापना दिन साजरा केला. गोवा सरकारचे सार्वजनिक बांधकाम विभाग, वैध मापन शास्त्र आणि कॅप्टन ऑफ पोर्ट्स मंत्री दिगंबर कामत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना कामत यांनी गेल्या 97  वर्षांतील भारतीय शेतीमधील आयसीएआरच्या  उत्कृष्ट योगदानाची प्रशंसा केली. त्यांनी तरुणांना शेती हा एक व्यवसाय म्हणून स्वीकारण्याचे आणि शेतीचा वारसा पुढे सुरू ठेवण्याचे आवाहन केले. आयसीएआरचे संशोधन आणि तांत्रिक नवोन्मेष हे लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यावर केंद्रित असावेत, यावर त्यांनी जोर दिला.

‘विकसित भारत @2047’ च्या संकल्पनेचा आणि गोवा सरकारच्या 2037 पर्यंतच्या ‘विकसित गोवा’ च्या वचनबद्धतेचा संदर्भ देत ते म्हणाले की, ही उद्दिष्टे केवळ एका मजबूत, प्रगतिशील आणि शाश्वत कृषी क्षेत्राच्या माध्यमातूनच पूर्ण केली जाऊ शकतात.

आमदार राजेश फळदेसाई यांनी गोव्याचे कृषी क्षेत्र मजबूत करण्यासाठी आणि कृषी संशोधन आणि शिक्षणाच्या माध्यमातून राज्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी आयसीएआरच्या  प्रयत्नांचे कौतुक केले. गोव्यात कृषी आणि पशुसंवर्धन संस्थेची स्थापना, तरुणांना शेती आणि कृषी-उद्योजकतेकडे वळण्यास प्रोत्साहन देईल, असे त्यांनी सांगितले. शाश्वत भविष्यासाठी गोव्याला आणि देशाला अधिक हरित करण्यासाठी शेतीचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी शेतकरी आणि तरुणांना केले.

गोवा उच्च शिक्षण महामंडळाचे अध्यक्ष गोविंद पर्वतकर यांनी, अन्नाची वाढती गरज भागवण्यासाठी स्थानिक भाजीपाला उत्पादन वाढवण्याच्या आणि गोव्याच्या ‘खाजण’  जमिनीची उत्पादकता सुधारण्याच्या गरजेवर भर दिला. जमिनीच्या व्यापारीकरणामुळे लागवडीखालील क्षेत्र सातत्याने कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी शेतजमिनींचे संरक्षण करण्याचे आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले, जेणेकरून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासोबतच कृषीचा शाश्वत विकास होईल.

आयसीएआर-सीसीएआरआय, गोव्याचे संचालक डॉ. परवीन कुमार यांनी विज्ञान-आधारित कृषी नवोन्मेषांच्या माध्यमातून भारताला अन्न-टंचाईकडून अन्न-अधिशेष (अन्नाचे अतिरिक्त उत्पादन असणारा) देश बनवण्यामधील आयसीएआरच्या  क्रांतिकारक भूमिकेवर प्रकाश टाकला. गेल्या 75 वर्षांत भारताची लोकसंख्या 4.1 पटीने वाढली असली, तरी पिकांच्या सुधारित जाती, आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण आणि प्रभावी संशोधन-प्रसार प्रणालीमुळे अन्नधान्य उत्पादन 7.4 पटीने वाढले आहे;यामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि शाश्वत कृषी विकासाची हमी मिळाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

आयसीएआर-सीसीएआरआयचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गोपाळ आर. महाजन यांनी संस्थेच्या गौरवशाली वाटचालीची माहिती दिली. तसेच हवामानाशी सुसंगत तंत्रज्ञान, किनारी परिसंस्थेचे शाश्वत व्यवस्थापन आणि शेतकरी-केंद्रित नवोन्मेषांमुळे किनारी भागातील शेती आणि ग्रामीण जीवनमान कसे सुदृढ झाले, याचे सादरीकरण त्यांनी केले.

या निमित्ताने संस्थेचे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामुळे उपस्थित मान्यवर, शेतकरी, तरुण आणि इतर सहभागींना संस्थेच्या संशोधन-आधारित नवोन्मेषांचा जवळून अनुभव घेण्याची आणि संवाद साधण्याची संधी मिळाली.

या कार्यक्रमाला शेतकरी महिलांसह 200 हून अधिक शेतकरी उपस्थित होते.

Trending

Exit mobile version