गोवा खबर : गोवा प्रदेश काँग्रेस सेवा दलाची कार्यकारिणी बैठक आज सकाळी ११.०० वाजता पणजी येथील काँग्रेस भवनात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत सेवा दलाच्या संघटनात्मक विस्ताराबरोबरच आगामी कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली.
बैठकीला गोवा डेस्क प्रभारी सौ. कल्पना जोशी तसेच गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस व सेवा दल प्रभारी श्री विजय भिके यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीच्या प्रारंभी काँग्रेस सेवा दलाचे नवनियुक्त राष्ट्रीय मुख्य संघटक श्री बी. व्ही. श्रीनिवास यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सेवा दल देशभरात अधिक सक्षम व प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करून त्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
संघटनात्मक विषयांवर झालेल्या चर्चेत उत्तर गोवा जिल्ह्यासाठी तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ९ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव सोहळा आयोजित करून त्यानंतर जनक्रांती यात्रेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे नियोजन करण्यात आले. आगामी दिल्ली अधिवेशनाच्या तयारीसह गोव्यातील सेवा दलाची संघटनात्मक रचना अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. अध्यक्षांच्या परवानगीने इतर विविध विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रत्येक मतदारसंघात नियमितपणे ध्वज वंदन कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
“चलो गाँव की ओर” या अभियानांतर्गत सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी गावागावांत जाऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधावा, त्यांच्या वस्त्यांमध्ये एक रात्र मुक्काम करून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्यांच्याशी विश्वासाचे नाते निर्माण करावे, असे आवाहन करण्यात आले.
तसेच “रवि मिलन” उपक्रमांतर्गत प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधावा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची विचारधारा, मूल्ये आणि तत्त्वे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावीत तसेच पक्षाशी जनसंपर्क अधिक दृढ करण्यासाठी सातत्याने कार्य करावे, असेही बैठकीत ठरविण्यात आले.
या बैठकीस सौ. कल्पना जोशी, श्री राजेन घाटे, श्री के. नामशीकर, श्री कुलकर्णी, सौ. रोझा अँथोनेट डायस, सौ. मारिया सिमॉन्स, श्री दामोदर शिरोडकर, श्री बाळकृष्ण माणेरकर तसेच सेवा दलाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचा समारोप गोवाभर काँग्रेस सेवा दल अधिक सक्षम, सक्रिय आणि जनतेशी जोडलेले संघटन म्हणून उभे करण्याचा तसेच आगामी सर्व संघटनात्मक, सामाजिक आणि जनआंदोलनात्मक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदविण्याचा दृढ संकल्प करून करण्यात आला.