गोवा खबर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेले गोव्यातील वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज डिचोली तालुक्यातील मुळगाव येथील ‘विठ्ठल रखुमाई वारकरी संस्थे’च्या वतीने त्यांच्या वार्षिक पायी वारीचा भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला.
या वारीमध्ये मुळगाव आणि परिसरातील सुमारे ७५ वारकरी उत्साहाने सहभागी झाले आहेत. “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल…” आणि ज्ञानबा-तुकारामाच्या जयघोषात, तसेच विठ्ठलाची भजने गात हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. गोव्यातून सुरू झालेल्या या भक्तीमय प्रवासामुळे संपूर्ण परिसरात विठ्ठलनामाचा गजर ऐकायला मिळत असून, वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे.