गोवा खबर

सावर्डेत भाजपचे नवे समीकरण? संकेत आर्सेकरांच्या राजीनाम्यामागे नेमके काय?

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यात विधानसभा निवडणुकांची चाहूल लागली की राजकीय घडामोडींना वेगळेच महत्त्व प्राप्त होते. विरोधी पक्षांच्या हालचालींसोबतच सत्ताधारी पक्षातील प्रत्येक निर्णयाचाही राजकीय अर्थ लावला जातो. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री कार्यालयाच्या संयुक्त सचिवपदाचा संकेत आर्सेकर यांनी दिलेला राजीनामा हा केवळ प्रशासकीय निर्णय म्हणून न पाहता, आगामी राजकीय घडामोडींचा संकेत म्हणून चर्चेत आला आहे.

संकेत आर्सेकर यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात “आता माघार नाही” असा स्पष्ट संदेश दिला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील राजकीय नियुक्तीच्या पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा अद्याप स्वीकारला गेला नसला तरी तो स्वीकारला जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे या निर्णयामागील राजकीय वेळ आणि त्याचे परिणाम याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.विशेष म्हणजे यापूर्वी या पदावर सिद्धार्थ कुंळयेकर आणि सदानंद तानावडे यांनी कामं केले होते. त्यानंतर दोघांनी राजकारणात प्रवेश केला होता. संकेत आर्सेकर देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

गेल्या काही वर्षांत संकेत आर्सेकर यांनी सावर्डे मतदारसंघात सातत्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने जनसंपर्क वाढवला. मोठ्या राजकीय घोषणांपेक्षा स्थानिक प्रश्न सोडवणे, कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करणे, युवकांशी संवाद, सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, वैद्यकीय मदत, सरकारी कामांसाठी पाठपुरावा अशा माध्यमातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यामुळे त्यांची प्रतिमा केवळ पक्षातील पदाधिकारी म्हणून न राहता स्थानिक नेतृत्व म्हणूनही तयार होत गेली.

त्यांचा राजकीय प्रवासही संघ परिवाराच्या कार्यपद्धतीतून घडलेला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप विद्यार्थी प्रकोष्ठ आणि भाजयुमोमध्ये काम करत त्यांनी संघटनात्मक अनुभव मिळवला. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन आणि नेतृत्वाचे धडे घेतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यकाळात त्यांना अधिक मोठ्या जबाबदाऱ्या मिळाल्या. त्यामुळे पक्षातील नव्या पिढीच्या नेतृत्वामध्ये त्यांचे नाव सातत्याने पुढे येऊ लागले.

भाजपमध्ये सध्या अनेक मतदारसंघांत पर्यायी नेतृत्व उभे करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही युवकांना संधी देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. या पार्श्वभूमीवर सावर्डेमध्ये संकेत आर्सेकर आणि कुडचडेमध्ये रोहन गावस देसाई यांसारखे युवा चेहरे अधिक सक्रिय होत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे या हालचालींना पक्षाकडून कोणताही विरोध झालेला दिसत नाही.

सावर्डे मतदारसंघात माजी मंत्री विनय तेंडुलकर, माजी मंत्री दीपक पाऊसकर आणि विद्यमान आमदार तथा सभापती डॉ. गणेश गावंकर यांसारखे प्रभावी नेते असताना संकेत आर्सेकर यांनी स्वतःसाठी स्वतंत्र राजकीय जागा निर्माण केली आहे. त्यांनी अद्याप उमेदवारीची अधिकृत मागणी केलेली नसली तरी भविष्यात तिकीटासाठी दावा करण्याइतकी ताकद त्यांनी उभी केल्याचे राजकीय निरीक्षक मानतात.

राजीनाम्यानंतर त्यांच्यावर मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधित प्रशासकीय मर्यादा राहणार नाहीत. त्यामुळे मतदारसंघातील दौरे, संघटनात्मक बांधणी आणि जनसंपर्क मोहिमा अधिक वेगाने राबवण्याची संधी त्यांना मिळू शकते. दुसरीकडे, सभापती या घटनात्मक पदामुळे डॉ. गणेश गावंकर यांच्यावर काही राजकीय मर्यादा आहेत. त्यामुळे आगामी काळात सावर्डेतील राजकीय समीकरणे अधिक रंगतदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मात्र या संपूर्ण घडामोडीकडे केवळ अंतर्गत गटबाजी म्हणून पाहणेही योग्य ठरणार नाही. कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षात नव्या नेतृत्वाचा उदय ही सातत्याने घडणारी प्रक्रिया असते. महत्त्वाचे म्हणजे ही प्रक्रिया पक्षाच्या नियोजनाचा भाग असते की अंतर्गत स्पर्धेचा परिणाम, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

एक गोष्ट मात्र निश्चित आहे— मुख्यमंत्री कार्यालयाच्या संयुक्त सचिवपदाचा राजीनामा देऊन संकेत आर्सेकर यांनी सावर्डेच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे. हा निर्णय त्यांच्या राजकीय प्रवासाला नवी दिशा देतो की भाजपमधील अंतर्गत स्पर्धेला अधिक धार देतो, याचे उत्तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या राजकारणात मिळणार आहे.

Trending

Exit mobile version