मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून मोठ्या घोषणा; ‘माझे ड्रायव्हर’ ॲपचे झाले लोकार्पण
गोवा खबर : गोव्यातील पारंपरिक दुचाकी पायलटांचे जीवन सुकर करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. ५० वर्षांवरील पारंपरिक पायलटांना आता सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ दिला जाईल, तसेच नवीन ई-बाईक खरेदीवर ५० टक्के अनुदान आणि स्मार्टफोन नसलेल्या पायलटांना मोफत स्मार्टफोन देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
गोवा मोटारसायकल टॅक्सी रायडर्स असोसिएशन आणि वाहतूक संचालनालय यांच्या संयुक्त समन्वयाने तयार करण्यात आलेल्या ‘माझे ड्रायव्हर’ या विशेष मोबाईल ॲपचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, उद्योजक रेबेका लोबो आणि सॅम्युअल टिमोथी यांच्यासह मोठ्या संख्येने दुचाकी पायलट उपस्थित होते.
हे नवीन ॲप गोव्यातील स्थानिकांनी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांसाठी विकसित केले असून, यामुळे प्रवाशांना सहजपणे दुचाकी पायलट शोधता येतील आणि पायलटांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. या ॲपच्या माध्यमातून केवळ प्रवाशांची वाहतूकच होणार नाही, तर घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) देण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्यामुळे पायलटांना रिकाम्या वेळेत अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल. भाडे किंवा अतिरिक्त शुल्काबाबत कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून प्रवाशांना थेट पायलटलाच पैसे द्यावे लागतील, त्यामुळे पारंपारिक पद्धतीत कोणताही बदल होणार नाही. वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले की, बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान स्वीकारणे ही काळाची गरज असून या ॲपला पायलटांचा कोणताही विरोध नाही, कारण हा उपक्रम पूर्णपणे त्यांच्या हितासाठी आणि उत्पन्नात वाढ करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बेकायदेशीर खाजगी वाहनांचा वापर करून प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना कडक इशारा दिला असून अशा वाहनांवर कठोर कारवाई करून ती जप्त केली जातील, असे स्पष्ट केले आहे.