गोवा खबर

कला अकादमीत १२ जुलै रोजी रंगणार ‘स्वरमंगेश रिटर्न्स’ संगीत महोत्सव

Published

on

Spread the love

दीनानाथ मंगेशकर सभागृहात नवोदित आणि नामवंत कलाकारांचा रंगणार शास्त्रीय कलाविष्कार

गोवा खबर : येत्या रविवार, १२ जुलै रोजी कला अकादमीच्या नूतनीकरण केलेल्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात एका विशेष शास्त्रीय संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वस्तिक-पणजी’ आयोजित ‘स्वरमंगेश रिटर्न्स’ हा खास एकदिवसीय महोत्सव सकाळी ९:३० वाजता सुरू होणार असून, यामध्ये देशातील अनेक तरुण, प्रतिभावान आणि नामवंत कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

दरवर्षी ‘स्वरमंगेश’ हा तीन दिवसीय भव्य समारोह डिसेंबर महिन्यात आयोजित केला जातो. मात्र, गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर २०२५ मध्ये ऐनवेळी उद्भवलेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या अंतर्गत समस्येमुळे विमानांचे उड्डाण विस्कळीत झाले होते, ज्यामुळे काही नामवंत कलाकार १४ व्या स्वरमंगेश महोत्सवात वेळेत पोहोचू शकले नाहीत व भाग घेऊ शकले नव्हते. त्या येऊ न शकलेल्या सर्व कलाकारांचा विशेष कलाविष्कार रसिकांना अनुभवता यावा, यासाठी या एकदिवसीय ‘स्वरमंगेश रिटर्न्स’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वस्तिकचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गावकर यांनी सांगितले की, सूर, ताल आणि नृत्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आणि तरुण, लोकप्रिय व गुणवान कलाकारांच्या अभिजात संगीताचा आविष्कार अनुभवण्यासाठी कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात संगीत रसिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. खऱ्या अर्थाने या महोत्सवात सुरांच्या आणि तालाच्या आधीन होऊन रसिकांनी कलाकारांना दाद द्यावी, असे आवाहन त्यांनी आयोजकांच्या वतीने केले आहे. ‘स्वरमंगेश रिटर्न्स’ हा सोहळा सर्व रसिकांसाठी पूर्णपणे खुला असून, सभागृहातील काही जागा नेहमीप्रमाणे निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

Trending

Exit mobile version