राजदीप ग्रुप आणि रुद्रेश्वर, पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने चार गटांत रंगणार स्पर्धा
गोवा खबर : गोव्यातील संगीतप्रेमी आणि उदयोन्मुख गायक-गायिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. राजदीप ग्रुप आणि रुद्रेश्वर, पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गोमंतस्वर २०२६’ या राज्यातील पहिल्या अखिल गोवा हिंदी कराओके गायन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राजदीप ग्रुपचे सर्वेसर्वा राजेश तारकर यांनी दिली.
पणजी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत या कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश कापडी व अशोक परब यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून २० जुलै २०२६ ही नाव नोंदणीची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी प्रति स्पर्धक केवळ १०० रुपये प्रवेश शुल्क असणार आहे. स्पर्धेची पहिली ऑडिशन २६ जुलै रोजी, दुसरी ऑडिशन २ ऑगस्ट रोजी, तर भव्य अंतिम फेरी २९ ऑगस्ट २०२६ रोजी पणजी येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कलाकारांना हिंदी चित्रपट तसेच गैरचित्रपट गीतांचे कराओके ट्रॅकवर सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा एकूण चार वेगवेगळ्या वयोगटांत होणार आहे. यामध्ये गट अ – १५ वर्षांखालील मुले-मुली, गट ब – १५ ते ५० वर्षे वयोगटातील पुरुष व महिला, गट क – ५० वर्षांवरील स्पर्धक आणि गट ड – कोणत्याही वयोमर्यादेशिवाय युगल (डुएट) गायनासाठी राखीव असेल. अ, ब आणि क गटात स्पर्धकांना एकल (सोलो) सादरीकरण करावे लागेल, तर ड गटात केवळ युगल सादरीकरण होईल. प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके, चषक आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सर्व गटांमधील सर्वोत्तम गायकाला अत्यंत प्रतिष्ठित असा ‘गोमंतस्वर फिरता चषक’ देऊन गौरविण्यात येईल. त्यामुळे राज्यातील सर्व संगीतप्रेमी आणि कराओके गायकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजेश तारकर व आयोजकांनी केले आहे.