गोवा खबर: सम्राट क्लब केरी आयोजित सम्राट काव्यमहोत्सव २०२६ – “सरीवर सरी” हा काव्यसोहळा आय.बी.एम. हॉल, पणजी येथे उत्साहात पार पडला. राज्यभरातील कवी, गीतकार आणि साहित्यप्रेमी या महोत्सवात सहभागी झाले.
महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध लेखक, कवी आणि गीतकार अरविंद जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी कविता समाजाशी जोडलेली असावी आणि समकालीन विषयांवरही कवींनी लेखन करावे, असे आवाहन केले. तसेच त्यांनी आपली गाजलेली ‘पत्र’ ही साहित्यकृती सादर केली.
काव्यमहोत्सवाचे अध्यक्ष दीपक नार्वेकर यांनी गोव्यातील कवी आणि साहित्यप्रेमींना एकत्र आणण्यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचे सांगितले. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रगांझाचे अध्यक्ष दशरथ परब यांनी साहित्य आणि कवींना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे नमूद केले.
उद्घाटनप्रसंगी किशोर शाह आणि कवी दत्तप्रसाद जोग यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शशिकांत पुनाजी, डॉ. राम गावस, कालिका बापट, अॅड. मोहन गावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
समारोप समारंभाला केंद्रीय ऊर्जा व नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी कविता समाजाच्या भावना व्यक्त करणारे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत आयोजकांचे कौतुक केले. यावेळी सहभागी कवी-कवयित्री तसेच आयोजन समितीचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
मराठी आणि कोंकणी भाषेतील काव्यसादरीकरणामुळे “सरीवर सरी” हा काव्यमहोत्सव गोव्याच्या समृद्ध साहित्य परंपरेचा उत्सव ठरला.