गोवा खबर : भारत हवामान विभागाच्या (IMD) गोवा केंद्राने ५ जुलै ते ९ जुलै या कालावधीत उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ५ आणि ६ जुलै रोजी काही ठिकाणी ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर ७ ते ९ जुलै दरम्यानही काही भागांत ताशी ४० ते ५० किमी वेगाने वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, १० आणि ११ जुलै रोजी राज्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार, ५ ते ११ जुलै या संपूर्ण आठवड्यात गोव्यात बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने जारी केलेला यलो अलर्ट लक्षात घेऊन नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.