गोवा खबर

मराठी पाठ्यपुस्तकांबाबतचा वाद निराधार; मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाल्याचा दावा

Published

on

Spread the love

गोवा खबर: गोवा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) इयत्ता पाचवी ते नववीसाठी तयार केलेल्या मराठी पाठ्यपुस्तकांबाबत निर्माण करण्यात आलेला वाद वस्तुस्थितीसमोर टिकू शकला नसल्याचा दावा मराठी राजभाषा निर्धार समितीने केला आहे.

समितीचे निमंत्रक सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, पाठ्यपुस्तके तयार करताना ४० टक्के स्थानिक आशय (Local Content) समाविष्ट करण्याच्या निकषाचे पूर्णपणे पालन करण्यात आले आहे. SCERT मधील ज्येष्ठ अधिकारी प्राचार्य अनिल सामंत यांनी व्हिडिओद्वारे या विषयावरील सर्व आक्षेपांचे सविस्तर स्पष्टीकरण दिले असून ते समाधानकारक असल्याचे समितीने म्हटले आहे.

प्रसिद्धीपत्रकात काही व्यक्तींनी पाठ्यपुस्तके न पाहताच प्रतिक्रिया देऊन या विषयाला प्रादेशिक अस्मिता आणि महाराष्ट्रवाद यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अभ्यासक्रमातील मार्गदर्शक तत्त्वांची पडताळणी न करता अनावश्यक वाद निर्माण करण्यात आल्याचे समितीने म्हटले आहे.

तसेच, मराठी आणि कोकणी भाषेच्या नावावर कृत्रिम वाद निर्माण करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न निंदनीय असल्याचे नमूद करत, गोमंतकीयांनी अशा प्रयत्नांना बळी पडू नये, असे आवाहन सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी केले आहे.

Trending

Exit mobile version