गोवा खबर

आरजीपीतील वाद चिघळला; आमदार वीरेश बोरकरांविरोधात सायबर पोलिसांत तक्रार

Published

on

Spread the love

पणजी: रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (आरजीपी) मधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले असून, पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांच्याविरोधात पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी सायबर पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांवर अनधिकृतपणे नियंत्रण मिळविल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

पक्षाचे सरचिटणीस विरेश नाईक, खजिनदार अजय खोलकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आमदार बोरकर यांच्या समर्थकांनी ताबा मिळविल्याचा संशय असून, यामुळे पक्षाच्या अधिकृत संवाद व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. याप्रकरणी सायबर सेलकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

पदाधिकाऱ्यांनी असा आरोपही केला की, पक्षाच्या व्हॉट्सअॅप गटातून त्यांना वगळण्यात आले असून, सोशल मीडिया व्यवहारांमध्ये त्यांना पूर्णपणे दूर ठेवण्यात आले आहे. तसेच अलीकडील घडामोडी या पक्षावर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचा दावाही त्यांनी केला.

यासंदर्भात अजय खोलकर यांनी सांगितले की, पक्षातील विविध मुद्द्यांवर आमदार वीरेश बोरकर यांच्याशी अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, सरचिटणीस विरेश नाईक यांनी स्पष्ट केले की, पक्षाने केवळ संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, एवढीच मागणी केली आहे. ही कारवाई कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून पक्षाच्या अधिकृत यंत्रणेचे संरक्षण आणि सत्य समोर यावे, या उद्देशाने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Trending

Exit mobile version