गोवा खबर

मराठीला राजभाषेचा दर्जा द्या; सरकारने पुढाकार घ्यावा : मराठी राजभाषा निर्धार समितीची सुदिन ढवळीकरांकडे मागणी

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा आणि यासाठी सरकारने ठोस भूमिका घेत पुढाकार घ्यावा, अशी ठाम मागणी मराठी राजभाषा निर्धार समितीने वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे केली. मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी विविध राजकीय नेते, आमदार आणि मंत्र्यांच्या भेटीगाठींच्या मालिकेत समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी बांदोडा येथील त्यांच्या निवासस्थानी सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले.

मराठी राजभाषा निर्धार समितीचे राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर आणि प्रमुख मार्गदर्शक गो.रा. ढवळीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ही भेट घेतली. यावेळी मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासंदर्भातील अधिकृत आकडेवारी, इतर राज्यांतील परिस्थिती, घटनात्मक तरतुदी तसेच विविध कायदेशीर बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शिष्टमंडळाने सुदिन ढवळीकर यांना, ते सरकारचे घटक असल्याने तसेच मराठी हा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचाही प्रमुख विषय असल्यामुळे, हा प्रश्न सरकारपातळीवर चर्चेला आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली.

या शिष्टमंडळात केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सम्राट दिवाकर शिंक्रे, आर्किटेक्ट मच्छिंद्र च्यारी, सहकोषाध्यक्ष रामदास सावईवेरेकर, लेखक डॉ. बिभीषण सातपुते, कोषाध्यक्ष सूर्यकांत गावस तसेच उद्योजक विनोद पोकळे यांचा समावेश होता.

समितीच्या माहितीनुसार, ही चर्चा सकारात्मक आणि चांगल्या वातावरणात पार पडली.

Trending

Exit mobile version