अद्ययावत विमानतळ संपूर्ण विदर्भात व्यापार, पर्यटन, खाणकाम आणि गुंतवणुकीला चालना देणार
गोवा खबर:नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आधुनिकीकरण आणि विस्तार यामुळे संपर्क वाढेल, गुंतवणूक येईल, रोजगार निर्मिती होईल आणि संपूर्ण विदर्भात औद्योगिक विकासाला चालना मिळून मध्य भारताचे आर्थिक परिदृश्य लक्षणीयरीत्या बळकट होईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितले.
नागपूरचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर जीएमआर समूहाकडे हस्तांतरित करण्याच्या औपचारिक समारंभात गडकरी बोलत होते. या समारंभाला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल आणि माया इवनाते उपस्थित होते.
भारताच्या भौगोलिक केंद्रावर असलेल्या नागपूरच्या धोरणात्मक स्थानावर प्रकाश टाकताना गडकरी म्हणाले की, हे शहर व्यापार, लॉजिस्टिक , उत्पादन, वाणिज्य आणि बहुविध वाहतुकीचे एक प्रमुख केंद्र म्हणून वेगाने उदयाला येत आहे. विमानतळाचा विस्तार आणि आधुनिकीकरण मध्य भारतात आर्थिक विकासाचे महत्वाचे इंजिन म्हणून नागपूरचे स्थान आणखी मजबूत करेल, असे त्यांनी नमूद केले.
अद्ययावत आंतरराष्ट्रीय विमानतळ संपूर्ण विदर्भ प्रदेशात पर्यटन, खाणकाम, कृषी आणि निर्याताभिमुख उद्योगांच्या वाढीला गती देण्यासाठी परिवर्तनात्मक भूमिका बजावेल, असेही गडकरी यावेळी म्हणाले. सुधारित विमानचालन पायाभूत सुविधा आणि संपर्कक्षमतेमुळे प्रवासी आणि मालवाहतूक वाढेल, त्यामुळे प्रादेशिक विकासाला चालना मिळेल आणि व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होतील, असे ते म्हणाले.
गडकरी यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला नागपूरहून सिंगापूर आणि दुबईसारख्या प्रमुख जागतिक गंतव्यस्थानांसाठी थेट आंतरराष्ट्रीय विमान संपर्क सुलभ करण्याची विनंती केली. अशा संपर्कामुळे व्यापार, पर्यटन, गुंतवणूक आणि व्यावसायिक देवाणघेवाण वाढेल, तसेच जागतिक बाजारपेठांशी नागपूरचा समन्वय वाढेल, असे ते म्हणाले.
स्थानिक उत्पादने आणि संस्कृतीला चालना देण्याचे महत्त्व अधोरेखित करताना, गडकरी यांनी विमानतळावर नागपूरची प्रसिद्ध संत्रा बर्फी आणि इतर प्रादेशिक वैशिष्टपूर्ण उत्पादने प्रदर्शित करण्याची सूचना केली, त्यामुळे स्थानिक उद्योजकांना मोठी प्रसिद्धी मिळेल आणि विदर्भाची सांस्कृतिक ओळख मजबूत होईल, असे त्यांनी सांगितले.
गडकरी यांनी के. राममोहन नायडू आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासातल्या एका नवीन अध्यायाचे प्रतीक असलेल्या विमानतळाच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण केले.
देशभरात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल आणि अतूट वचनबद्धतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांचे आभार मानले.