गोवा खबर : काणकोण तालुक्यातील आगोंद आणि पैंगिण परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. नुकतीच एका घराबाहेर पार्क केलेल्या वाहनाजवळ फिरताना आणि घराच्या वरांड्यात शिरून पाळीव मांजरीवर झडप घालतानाची बिबट्याची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
या वाढत्या धोक्यामुळे स्थानिक रहिवाशांनी वन विभागाकडे तातडीने पिंजरे लावण्याची, गस्त वाढवण्याची आणि कॅमेरा ट्रॅपद्वारे लक्ष ठेवण्याची मागणी केली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी सूर्यास्तानंतर घराबाहेर पडणे टाळण्यास सुरुवात केली असून, दरवाजे-खिडक्या बंद ठेवणे व पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासारखी खबरदारी घेतली जात आहे.