गोवा खबर : भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याची आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघात निवड करण्यात आली आहे. अवघ्या १५ वर्षांच्या वैभवसाठी हा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा टप्पा ठरला आहे.
आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभवने दमदार कामगिरी केली होती. त्याने २३० पेक्षा अधिक स्ट्राईक रेटसह ७७६ धावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये वैभवने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “शब्दांत सांगता येणार नाही अशी ही भावना आहे. लहानपणापासून बॅट हातात घेऊन मैदानावर सराव करत होतो आणि आज ते स्वप्न पूर्ण झाले आहे. माझ्या प्रवासातील हा सर्वात मोठा टप्पा आहे.”
बिहारमधील समस्तीपूर येथून क्रिकेटचा प्रवास सुरू केलेल्या वैभवने आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या ३८ चेंडूत १०१ धावांची खेळी करत टी-२० क्रिकेटमधील सर्वात युवा शतकवीर बनण्याचा विक्रम केला होता. त्यावेळी त्याचे वय १४ वर्षे आणि ३२ दिवस होते.
आयर्लंडविरुद्ध २६ किंवा २८ जून रोजी होणाऱ्या सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाल्यास तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात युवा खेळाडू ठरू शकतो. त्यामुळे सचिन तेंडुलकर यांचा १६ वर्षे २०५ दिवसांचा विक्रमही मागे पडू शकतो.
भारतीय संघाची जर्सी प्रथमच हातात घेतल्याचा क्षण आठवताना वैभव म्हणाला, “माझे नाव असलेली भारतीय संघाची जर्सी पाहताच मी आनंदाने भारावून गेलो. चेहऱ्यावरचे हसू थांबत नव्हते. हे जणू स्वप्न साकार झाल्यासारखे वाटले.”
भारतीय क्रिकेटला एक नवा युवा तारा मिळाल्याची भावना क्रिकेटप्रेमींमध्ये व्यक्त होत असून वैभव सूर्यवंशीकडून आगामी मालिकांमध्ये मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.