गोवा खबर : डिचोली येथे पद्मिनी फाऊंडेशनतर्फे साखळी मतदारसंघातील दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रतिपादन केले की, राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याचे भविष्य घडवण्यासाठी सरकार कार्यरत असून गुणवंत विद्यार्थ्यांसह कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जात आहेत.
साखळीच्या रवींद्र भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत, मार्गदर्शक अँड. ईशान्य उसपकर, खजिनदार मैथिली परब, प्रज्ञा काणेकर, डॉ. लक्ष्मी परब, रामा नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गोव्यात आता उच्च शिक्षणाच्या सर्व संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडीनुसार कौशल्यपूर्ण शिक्षण निवडून भविष्याची वाटचाल करावी. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील शिक्षक आणि मार्गदर्शकांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सुलक्षणा सावंत यांनी विद्यार्थ्यांना नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून पारंपरिक शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षणाचा स्वीकार करत पुढे जाण्याचे आवाहन केले.