गोवा खबर

साळगावकर समूहाची १,०२३ कोटींची मालमत्ता जप्त

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यात बेकायदेशीर लोहखनिज उत्खनन आणि निर्यात करून हजारो कोटी रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) साळगावकर समूहावर कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत एव्हीएस समूहाची तब्बल १,०२३ कोटी ८५ लाख रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता ईडीने तात्पुरती जप्त केली असून यात सिंगापूर येथील मालमत्तांचाही समावेश आहे.

ही जप्त केलेली मालमत्ता अनिल साळगावकर यांच्या इस्टेटच्या नावे तसेच साळगावकर मायनिंग इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, शांतिलाल खुशालदास अँड ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड, एस. कांतिलाल अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, सालिथो ओर्स प्रायव्हेट लिमिटेड, व्हर्टेक्स न्यूटन प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सुवर्णरेखा पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या नावावर आहे.

गोवा पोलिसांच्या सीआयडी क्राईम ब्रँचने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने हा तपास सुरू केला होता. सर्वोच्च न्यायालयाने २०१४ आणि २०१८ मध्ये दिलेल्या निर्णयात २००७ नंतर गोव्यात खाणकाम बेकायदेशीरपणे झाल्याचे स्पष्ट केले होते.

मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत १९ जून रोजी जप्तीचा हा आदेश जारी करण्यात आला. यामध्ये भारतातील ४५९ कोटी १० लाख रुपये मूल्याच्या ९९ स्थावर मालमत्ता, सिंगापूरमधील ४७१ कोटी ३२ लाख रुपये मूल्याच्या ३१ स्थावर मालमत्ता आणि भारतीय कंपन्यांमधील ९३ कोटी ४२ लाख रुपयांच्या शेअर्सचा समावेश आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार साळगावकर समूहाने २००७ ते २०१२ या काळात दहा खाण पट्टे चालवले, ज्यातून २,४९२ कोटी ९५ लाख रुपयांची अवैध कमाई केली गेली. हे खनिज अतिशय कमी किमतीत ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स येथील बनावट कंपन्यांना निर्यात दाखवण्यात आले आणि पुढे कागदोपत्री मध्यस्थ कंपन्यांनी हेच खनिज चीनला विकून अंदाजे २,७४४ कोटी ९१ लाख रुपयांचा नफा कमवला. या संपूर्ण गैरव्यवहारातून एकूण ५,२३७ कोटी ८४ लाख रुपयांची काळी कमाई झाली, जो पैसा ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स व सिंगापूरमधील बनावट कंपन्यांमार्फत परदेशात मालमत्ता खरेदीसाठी वापरण्यात आला.

Trending

Exit mobile version