गोवा खबर : फोंडा जवळील भोम येथे शनिवारी सकाळी एक भीषण रस्ता अपघात झाला. शासकीय कामानिमित्त गोव्यात आलेले कर्नाटकातील पाच युवक कारने (केए ३२ झेड ४६४१) फोंड्याहून पणजीच्या दिशेने जात होते. भोम येथील श्री सतीदेवी घुमटीजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट घुमटीला जाऊन जोरात धडकली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला.
अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कारचा पत्रा कापून अडकलेल्या युवकांना बाहेर काढले. या अपघातात त्रिलोकनात हिरेमठ (वय २६, रा. कुलवर्गा) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर मौनेश एम, सचिन आळंदकर, बसलिंगप्पा दट्टनगाव आणि शिवकुमार (सर्व रा. धारवाड) हे चारही जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर गोमेकॉमध्ये उपचार सुरू आहेत.