गोवा खबर

एक ते दीड महिना पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध; जलस्रोतमंत्री शिरोडकर यांचा दावा

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यातील धरणांमध्ये पुढील एक ते दीड महिना पुरेल एवढा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून नागरिकांनी चिंता करण्याची कोणतीही गरज नाही, असा दावा जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केला आहे.

यंदा गोव्यात मान्सून दाखल झाला असला तरी सुरुवातीच्या काळात पावसाने अपेक्षित जोर धरलेला नाही. त्यामुळे जूनच्या मध्यापर्यंत पर्जन्यमानात सुमारे ६० टक्के मोठी तूट नोंदवण्यात आली असून धरणांमधील पाणीपातळी खालावली आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना जलस्रोतमंत्री म्हणाले की, संपूर्ण दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या साळावली धरणात १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. याशिवाय पंचवाडी आणि अंजुणे धरणांमध्येही पुरेसे पाणी असून साखळी व पडोशें जलशुद्धीकरण प्रकल्पांना बंधाऱ्यांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

साळावली, तिळारी, अंजुणे, आमठाणे, चापोली, पंचवाडी आणि गवाणे धरणांतील पाणीसाठा सध्या घटत असला, तरी उपलब्ध साठा महिनाभर पुरेल इतका आहे. दरम्यान, साळावली धरणाच्या जलाशयातून पाणी वितरित करणाऱ्या यंत्रणेचा काही भाग कोसळल्याने वास्कोतील पाणीपुरवठा प्रभावित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यावर पूर्ण माहिती घेतल्यानंतरच भाष्य करेन, असे सांगत त्यांनी पावसाने आणखी दडी मारल्यास काही भागांत परिणाम होऊ शकतो, असेही स्पष्ट केले. राज्याच्या दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी मान्सूनचा वेग वाढून धरणांमध्ये नव्याने पाणीसाठा होणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

Trending

Exit mobile version