गोवा खबर : महेश टिंबर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संबंधित १५५.२१ कोटी रुपयांच्या बँक फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे.
ईडीच्या चंदीगड विभागीय कार्यालयाने गोव्याची राजधानी पणजीसह हरियाणा आणि दिल्ली येथील एकूण ११ ठिकाणी छापे टाकून झाडाझडती घेतली. संबंधित कंपनीच्या संचालकांनी बँकांकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन ते बोगस कंपन्यांमार्फत इतरत्र वळवल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या काळ्या पैशाचा वापर गोव्यातील रिअल इस्टेट किंवा इतर व्यवसायांमध्ये करण्यात आला आहे का, यादृष्टीने ईडी सखोल तपास करत आहे. छाप्यात अनेक डिजिटल उपकरणे आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली असून गोव्यातील काही स्थानिक व्यावसायिकांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.