क्रांतिदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यसैनिकांच्या २७ पाल्यांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान
गोवा खबर : “गोवा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येत असलेल्या पत्रादेवी हुतात्मा स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरच पूर्ण होईल. स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करणे आणि त्यांच्या पाल्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, या धोरणाशी सरकार कटिबद्ध राहील,” अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
आझाद मैदानावर आयोजित ८० व्या क्रांतिदिन वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात राज्यपाल पी. अशोक गणपती राजू यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिकांच्या २७ मुलांना शासकीय नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. व्यासपीठावर केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गोव्याला देशाची पर्यटन राजधानी बनवणे आणि उच्च शिक्षणासाठी पुढील ५० वर्षांचा विकास आराखडा तयार करण्यावर सरकार काम करत आहे.
दुसरीकडे, गोवा, दमण आणि दीव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई यांनी जनतेला आवाहन केले की, “सरकार जर चांगली विकासकामे करत असेल, तर त्याचे स्वागत केले पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर केवळ टीका करण्याची भूमिका न घेता सकारात्मक पाऊलांना साथ द्यावी.” पत्रादेवीचे स्मारक पुढील पिढ्यांसाठी स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा देणारे स्मृतीस्थळ ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.