गोवा खबर

मित्राच्या संघर्षातून अवयवदानाचा संदेश; वाढदिवसानिमित्त संकेत अर्सेकर यांचा अनोखा उपक्रम

Published

on

Spread the love

गोवा खबर : आपल्या जिवलग मित्राच्या गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या किडनीच्या आजाराशी झुंजीने प्रेरित होऊन सावर्डे येथील युवक संकेत अर्सेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. १८ जून रोजी तिस्क-सावर्डे येथे ते भव्य अवयवदान जनजागृती व नोंदणी शिबिराचे आयोजन करणार आहेत.

संकेत अर्सेकर यांचे जिवलग मित्र तुषार चिकोडी यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली असून, गेली चार वर्षे त्यांना आठवड्यातून तीन वेळा डायलिसिससाठी रुग्णालयात जावे लागते. मित्राच्या या संघर्षाचे जवळून साक्षीदार असलेल्या संकेत यांनी समाजात अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा निर्धार केला आहे.

याबाबत बोलताना संकेत अर्सेकर म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीकडे एखाद्याचे प्राण वाचवण्याची ताकद असते. मृत्यूनंतर आपले डोळे, किडनी, यकृत यांसारखे अवयव दान करून अनेकांना नवजीवन देता येऊ शकते. देशात दरवर्षी लाखो रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची गरज असते, मात्र अवयवदात्यांच्या अभावामुळे अनेकांना वेळेत उपचार मिळत नाहीत.

आपल्या मित्राच्या वेदना जवळून पाहिल्यानंतरच हा उपक्रम हाती घेतल्याचे संकेत यांनी सांगितले. अधिकाधिक लोकांनी अवयवदानाचा संकल्प करावा आणि गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे, हीच आपल्या वाढदिवसाची खरी भेट असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, तुषार चिकोडी यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, जर त्यांच्या संघर्षामुळे काही लोकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला, तर त्यांचा हा लढा सार्थकी लागेल. कुठेतरी एखादा रुग्ण नव्या जीवनाच्या आशेने वाट पाहत असतो आणि त्याच्यासाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो, असेही त्यांनी म्हटले.

संकेत अर्सेकर यांच्या या उपक्रमामुळे अवयवदानाबाबत समाजात सकारात्मक संदेश पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Trending

Exit mobile version