गोवा खबर

विरोधकांना मिळेना झाड कापण्याचे मशीन, पणजी महानगरपालिकेकडून विरोधी नगरसेवकांवर अन्याय

Published

on

Spread the love

गोवा खबर : महानगरपालिकेकडून विरोधी नगरसेवकांवर अन्याय होत आहे. साधे झाडे कापण्याचे मशीन देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नगरसेवक लिओनार्ड फुर्तादो यांनी केला. वारंवार आम्ही याचा पाठपुरावा करीत आहे. परंतु दरवेळी मशीन पाठवले जाईल असेच सांगितले जाते. त्यामुळे पावसाळा सुरू झाला तरी अजूनही आमच्या प्रभागांमध्ये मान्सूनपूर्व कामे होऊ शकली नसल्याची टीका त्यांनी केली.

फुर्तादो म्हणाले की, नगरसेवक म्हणून शपथ घेऊन ७५ दिवस झाले. मात्र मनपाकडून विरोधी नगरसेवकांना विशेष करून मान्सूनपूर्व कामांबाबत सहकार्य केले जात नाही. आमच्या प्रभागांमध्ये धोकादायक झाडे असून, पावसाळ्यापूर्वी त्यांच्या फांद्या छाटणे आवश्यक आहे. परंतु मागणी करूनही त्यांना झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी मशीन दिले जात नाही.

उपमहापौर ही सर्व कामे पाहत असून, त्यांच्याकडूनही याविषयी टाळाटाळ होत आहे. यामुळे माझ्या प्रभागात झाडाची फांदी पडून एका गाडीचे नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी विरोधी नगरसेविका लिब्रेटा मेंडीस उपस्थित होत्या. नगरसेवक जॅक सुखिजा म्हणाले की, मान्सूनपूर्व कामे वेळेत न झाल्याने आमचे मतदार आम्हाला विचारत आहे. खरं तर या अत्यंत साध्या गोष्टी आहेत. मात्र मनपा प्रशासन आम्हाला सहकार्य करीत नाही. झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी आवश्यक असलेली साधी मशीन मिळवण्यासाठी जर एका नगरसेवकाला ताटकळत राहावे लागत असेल तर मग मोठ्या कामांचे काय होईल? मनपाने आता तरी यात लक्ष घालून आम्ही प्रभागांमधील प्रलंबित मान्सूनपूर्व कामे करून घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

सर्व प्रभागांमध्ये मनपाकडून मान्सूनपूर्व कामे नियमितपणे करण्यात आली होती. प्रत्येक प्रभागांमध्ये एक झाड कापण्याचे मशीन दिले होते. कामगार व मशीन याची सर्व जबाबदारी उपमहापौरांकडे आहे. विरोधी नगरसेवकांवर याबाबत कुठलाही अन्याय झाला नसून जर त्यांनी तसे सांगितले असल्यास त्यात लक्ष घालू, असे आश्वासन महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिले.

Trending

Exit mobile version