गोवा खबर

दाबोळी विमानतळ देशातील सर्वाधिक पसंतीचे: मंत्री माविन गुदिन्हो

Published

on

Spread the love

वास्को: दाबोळी विमानतळ हे केवळ गोव्यातच नव्हे तर देशातील सर्वाधिक पसंतीचे विमानतळांपैकी एक आहे. गोव्यात दोन विमानतळ कार्यरत असतानाही पणजी, पर्वरी आणि आसपासच्या भागातील अनेक प्रवासी दाबोळी विमानतळालाच प्राधान्य देतात. सुधारित रस्ते जोडणीमुळे विमानतळापर्यंत पोहोचणे अधिक जलद आणि सोयीचे झाले आहे, असे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

प्रवाशांचा प्रवास अनुभव अधिक सुखकर करण्यासाठी आणि सेवा गुणवत्तेचे मानदंड अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने दाबोळी विमानतळावर काल सोमवारी ‘यात्री सुविधा दिवस’ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. उद्घाटन समारंभाला मंत्री गुदिन्हो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि दाबोळी विमानतळ प्रशासनाच्या कार्याचे कौतुक करताना पर्यटक आणि प्रवाशांचे प्रभावी व्यवस्थापन तसेच सुविधा उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर दाबोळी विमानतळ बंद करण्याचे काही प्रयत्न झाले होते. मात्र ते अयशस्वी ठरले आणि दाबोळी विमानतळ आजही यशस्वीपणे कार्यरत असून भविष्यातही सुरू राहील, असेही गुदिन्हो यांनी स्पष्ट केले. विमानतळावरील सुविधांबाबत समाधान व्यक्त करत पार्किंग व्यवस्थेत आणखी सुधारणा करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

‘यात्री सुविधा दिवस’ उपक्रमाचा मुख्य उद्देश प्रवाशांशी थेट संवाद साधणे, त्यांचा अभिप्राय जाणून घेणे आणि जागतिक दर्जाच्या ग्राहक सेवेच्या वचनबद्धतेला अधिक बळकट देणे हा आहे. यानिमित्त विमानतळावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टर्मिनल इमारतीत प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या. दाबोळी विमानतळाचे संचालक फ्लाइट लेफ्टनंट आकाशदीप यांनी सांगितले की, या विशेष दिवशी प्रवाशांना सर्वोत्तम अनुभव मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. सध्या दाबोळी विमानतळावरून दरवर्षी सुमारे ६० लाख प्रवासी प्रवास करतात. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवा हाताळणाऱ्या या विमानतळावर सुरक्षित, सर्व हवामानात कार्यक्षम आणि प्रवाशाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर कायम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Trending

Exit mobile version