गोवा खबर : येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे सेना) ३० पेक्षा जास्त मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. युती करायची की नाही, याविषयी योग्य वेळी निर्णय घेणार आहे. सध्या पक्षाचे कामही आता जोरात सुरू आहे, असे शिवसेनेचे राज्यसमन्वयक अरुण मोरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी त्यांच्या सोबत उपेंद्र गावकर, काशिनाथ मयेकर, सुनील सांतिनेजकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना गोव्यात आपला जनाधार वाढवण्यासाठी सक्रियपणे काम करत असून, आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे लक्ष १५ हून अधिक जागा जिंकण्यावर असल्याचा दावा मोरे यांनी केला. दरम्यान, इतर पक्षांतील राजकीय पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना शिवसेनेत प्रवेश देण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाची संघटनात्मक वाढ ही निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावरच केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. गोव्यातील राजकारणात शिवसेनेची उपस्थिती अधिक प्रभावी करण्यासाठी पक्ष विविध स्तरांवर संघटन विस्ताराचे काम करत असल्याचे मोरे यांनी नमूद केले.
शिवसेनेचा वर्धापन दिन यंदा १९ जून रोजी गोव्यात साजरा करण्यात येणार असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी ‘शिवसंपर्क अभियान’ही राबविले जाणार आहे. शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम महाराष्ट्राबाहेर आयोजित केला जात आहे.