गोवा खबर : गोव्यातील टॅक्सी आणि रेंट-अ-कॅब व्यावसायिकांसाठी वाहतूक खात्याने कडक इशारा जारी केला आहे. स्पीड गव्हर्नर नसलेल्या किंवा बसविलेले स्पीड गव्हर्नर कार्यरत नसलेल्या व्यावसायिक प्रवासी वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, संबंधित वाहनांचे परवाने निलंबित किंवा रद्द केले जाऊ शकतात.
वाहतूक खात्याने जारी केलेल्या सार्वजनिक सूचनेत म्हटले आहे की, अपघात रोखण्यासाठी आणि अतिवेगामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या मोटार वाहन नियमांनुसार स्पीड गव्हर्नर बसविणे अनिवार्य आहे. गोव्यात पर्यटन हंगामात हजारो पर्यटक टॅक्सी आणि रेंट-अ-कॅब सेवांचा वापर करतात आणि महामार्गांवर अतिवेगामुळे होणाऱ्या अपघातांच्या घटना वारंवार समोर येत असल्याने खात्याने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. लवकरच यासाठी विशेष तपासणी मोहीम हाती घेतली जाणार आहे.