गोवा खबर

७५ लाख टन लोहखनिज निर्यातीला मिळाली मंजुरी; पावसाळ्यानंतर उत्खननाला होणार सुरुवात

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यातील खाण उद्योगाला आगामी हंगामात मोठी चालना मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नऊ खाण कंपन्यांना दरवर्षी सुमारे ७५ लाख टन लोहखनिज उत्खनन व निर्यातीसाठी ‘कन्सेंट टू ऑपरेट’ परवाना मंजूर केला आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर सुरू होणाऱ्या खाण हंगामात उत्खननाच्या कामांना मोठा वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. साधारणपणे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यापासून गोव्यात खाण हंगामाला प्रारंभ होतो.

राज्य सरकारने २०२३ मध्ये ई-लिलाव प्रक्रियेद्वारे नव्या खाण पट्ट्यांचे वाटप सुरू केल्यानंतर टप्प्याटप्प्याने काही खाणी पुन्हा सुरू झाल्या होत्या. मात्र, पर्यावरणीय मंजुरी, प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी व इतर कायदेशीर प्रक्रियांना वेळ लागत असल्याने अपेक्षित गतीने उत्खनन होत नव्हते.

खाण खात्याचे संचालक नारायण गाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत ४० लाख टनांहून अधिक लोहखनिजाचे उत्खनन झाले असून त्यापैकी २० लाख टनांपेक्षा अधिक खनिजाची विक्री केली गेली आहे. नव्याने सुरू झालेल्या खाण व्यवसायातून वार्षिक २ कोटी टन लोहखनिज निर्यातीचे ध्येय ठेवण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, गोव्यात खाण उद्योग पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे. बंदरांवरील मालवाहतूक वाढेल, बार्ज वाहतूक पुन्हा सक्रिय होईल आणि ट्रक व्यवसायाला स्थैर्य लाभेल. याशिवाय खाणींशी संबंधित लघुउद्योग, दुरुस्ती सेवा, यांत्रिक कामे व पुरवठा साखळीतील इतर व्यवसायांनाही मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

विशेषतः सत्तरी, सांगे, केपे, डिचोली आणि धारबांदोडा या खाणपट्ट्यातील तालुक्यांतील हजारो कुटुंबांचे उत्पन्न खाण उद्योगावर अवलंबून आहे. हा उद्योग पुन्हा सुरू झाल्याने स्थानिक लोकांच्या आर्थिक परिस्थितीत मोठी सुधारणा होणार आहे. ‘कन्सेंट टू ऑपरेट’ परवान्याद्वारे मिळालेली ही मंजुरी खाण उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, यामुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू होऊन पुढील काही वर्षांत उत्पादन हळूहळू वाढेल, ज्यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होऊन पायाभूत सुविधा विकास आणि रोजगाराला दीर्घकालीन स्थैर्य मिळेल.

Trending

Exit mobile version