गोवा खबर : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीसाठी नवी दिल्लीत दाखल झालेले मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सलग बारा वर्षे पंतप्रधानपदी राहून देशाची सेवा सुरू ठेवल्याबद्दल ढवळीकर यांनी मोदींचे अभिनंदन केले आणि आगामी काळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
पत्रकारांशी बोलताना ढवळीकर यांनी सांगितले की, या बैठकीच्या निमित्ताने त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेण्याची संधी मिळाली. एनडीएमध्ये आम्ही सर्व घटक पक्ष एकत्र आहोत आणि मगो पक्ष नेहमीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत खंबीरपणे उभा राहिला आहे.
गोव्यातील सर्वात जुन्या प्रादेशिक पक्षांपैकी एक असलेल्या मगोने गेल्या अनेक वर्षांपासून भाजपप्रणीत एनडीएशी आपली जवळीक कायम ठेवली आहे. दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत देशभरातील मित्रपक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतला होता, जिथे केंद्र सरकारच्या कामगिरीचा आढावा, आगामी राजकीय रणनीती आणि विकासविषयक कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा झाली.
या पार्श्वभूमीवर दीपक ढवळीकर यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन मगो पक्षाचा एनडीएवरील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. आगामी २०२७ मधील विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला असताना, मगोच्या भूमिकेबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, ‘मगो नेहमीच एनडीएसोबत आहे’ असे स्पष्ट करत ढवळीकर यांनी पक्षाची राजकीय दिशा आता पूर्णपणे जाहीर केली आहे.