गोवा खबर : ‘माझे घर’ योजनेंतर्गत घरे नियमित करण्यासाठी अनेक कोमुनिदाद घरमालकांना ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यास विलंब लावत आहेत, ज्यामुळे अनेक अर्ज प्रलंबित पडले आहेत, अशी माहिती महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली.
पणजी भाजप मंडळातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला बारा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महालक्ष्मी मंदिरात आयोजित केलेल्या प्रार्थना सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कोमुनिदाद ही एक स्वतंत्र संस्था असून सरकार केवळ तिच्या कामकाजावर लक्ष ठेवते, मात्र त्यांच्या जमिनींचे संरक्षण व सुरक्षा करण्याची पूर्ण जबाबदारी कोमुनिदादींचीच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री मोन्सेरात यांनी सांगितले की, काही कोमुनिदाद एनओसी देण्यास सहकार्य करत असले तरी काही ठिकाणी अजूनही विलंब होत आहे. वास्तव पाहता, कोमुनिदाद जागेत अनेक वर्षांपूर्वी बांधलेली घरे ही तत्कालीन कोमुनिदादींनी परवानगी दिल्यानंतरच बांधण्यात आली होती. त्यामुळे जुन्या चुका मान्य करून आता त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. कोमुनिदादच्या जागेत लोकांनी बेकायदेशीरपणे घरे बांधली असे म्हणता येणार नाही, कारण १९९० च्या सुमारास जर कोणी घर बांधले असेल, तर त्यावेळी कोमुनिदादींनी त्यांना परवानगी दिली होती, कारण त्यांच्या परवानगीशिवाय तिथे कोणीही घर बांधू शकत नाही. काही घरमालकांकडे याच्या रीतसर पावत्याही उपलब्ध आहेत. त्यामुळे कोमुनिदादींनी आपल्या जुन्या चुका सुधाराव्यात आणि घर नियमितीकरणाची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.