गोवा खबर

पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळे गोव्याचा कायापालट : मुख्यमंत्री

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १२ वर्षे देशाचे यशस्वी नेतृत्व पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे अभिनंदनपर पत्र लिहून आभार मानले. या पत्रात त्यांनी मोदींच्या दूरदृष्टीमुळे गोव्याचा कसा कायापालट झाला, याचा उल्लेख केला. मुख्यमंत्री सावंत यांनी नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीत भाग घेतला.

या पत्रात त्यांनी नमूद केले की, मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून आयुष्मान भारत, जनधन योजना, पीएम किसान आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना यांसारख्या उपक्रमांमुळे कोट्यवधी नागरिकांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा लाभली आहे. तसेच कलम ३७० रद्द करणे आणि अयोध्येत राम मंदिर उभारणी यांसारखे दीर्घकालीन राष्ट्रीय प्रश्नही याच कार्यकाळात मार्गी लागले आहेत.

गोव्याच्या विकासाचा विशेष उल्लेख करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारकडून राज्याला ३० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत मिळाली आहे. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, नवा जुआरी पूल, मडगाव पश्चिम बायपास, राष्ट्रीय महामार्गांचे विस्तारीकरण तसेच दोन वंदे भारत रेल्वे मार्ग ही कामे पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे उत्तम प्रतीक आहेत. याशिवाय राज्याच्या आर्थिक स्थितीतही लक्षणीय सुधारणा झाली असून नीती आयोगाच्या वित्तीय निर्देशांकात गोवा सर्व राज्यांमध्ये अव्वल स्थानावर आहे.

गोव्याच्या जीएसटी महसुलात ७४ टक्क्यांची वाढ झाली असून, खान उद्योग पुन्हा सुरू झाल्याने हजारो अवलंबून असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. गोव्याने ‘हर घर जल’, साक्षरता, बालमृत्यू दर नियंत्रण आणि विविध केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय यश मिळवले आहे. २०१४-१५ मधील प्रतिव्यक्ती उत्पन्न सुमारे ३.९१ लाख रुपयांवरून २०२५-२६ मध्ये ७ लाख रुपयांपेक्षा अधिक होण्याचा अंदाज असून गोव्याची आर्थिक प्रगती वेगाने होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Trending

Exit mobile version