गोवा खबर

पर्वरीत मोदी सरकारची तपपूर्ती विविध कार्यक्रमांनिशी साजरी

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीच्या तपपूर्ती आज पर्वरी भाजप मंडळातर्फे विविध कार्यक्रमानिशी साजरी करण्यात आली. 

बेती येथे “स्वच्छता ही सेवा” अंतर्गत व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पर्यटन तथा आयटी मंत्री आणि स्थानिक आमदार रोहन अशोक खंवटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमात जिल्हा पंचायत सदस्य अमित अस्नोडकर, पेन्ह द फ्रांकचे सरपंच सपनील चोडणकर, सुकूरच्या सरपंचा सोनिया पेडणेकर, मंडळ अध्यक्ष विनीत परब तसेच तिन्ही पंचायतींचे पंच सदस्य, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक सुध्दा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बार कॉर्नर ते विठोबा मंदिर रस्त्यापर्यंत दुतर्फा यावेळी साफसफाई करण्यात आली. 

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षांतील विकासकामांचा, खंवटे यांनी आढावा घेतला. देशभरात महामार्ग, रेल्वे, विमानतळ, बंदरे, कृषी, आरोग्य आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या क्षेत्रात झालेली अभूतपूर्व प्रगती, तसेच जनधन योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियानासारख्या योजनांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात मोठी सुधारणा झाल्याचे खंवटे यांनी अभिमानाने नमूद केले.

विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सलग ४ हजार ३९९ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत देशाच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेल्या पंतप्रधानांच्या यादीत आज नवा टप्पा गाठला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सलग कार्यकाळाचा विक्रमही त्यांनी मागे टाकल्याचे यावेळी खंवटे यांनी सांगितले. 

विकसित भारताच्या ध्येयाने प्रेरित होऊन देश आर्थिक, तांत्रिक आणि पायाभूत विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत असल्याचे इतर वक्त्यांनी सांगितले. कार्यक्रमा दरम्यान स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला. स्वच्छ भारत अभियानाला देशव्यापी लोकचळवळीचे स्वरूप देण्यात मोदी सरकारला यश आल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. यानंतर बेती येथील विठोबा रखुमाई मंदिरात विशेष पूजा व हवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावे तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रविकास आणि जनकल्याणाची वाटचाल अधिक वेगाने पुढे जावी, यासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली.

तसेच खंवटे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी बेती येथील श्री गुरू सिंग सभा गुरुद्वारालाही भेट देऊन मोदी यांच्या उत्तम आरोग्य, निरोगी दीर्घायुष्य आणि देश सेवेसाठी सतत कार्य करण्याच्या शक्तीसाठी विशेष प्रार्थना केली. हरिदास सेवाही या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. सर्वधर्मसमभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

देशाला आत्मनिर्भरतेच्या दिशेने नेण्याबरोबरच स्टार्टअप, संरक्षण उत्पादन, डिजिटल अर्थव्यवस्था, अंतराळ संशोधन आणि जागतिक राजनैतिक क्षेत्रात भारताने भक्कम स्थान निर्माण केल्याचेही यावेळी नमूद झाले. तसेच विठोबा मंदिरात “योगा विथ वेलनेस” अंतर्गत आयोजित आयुर्वेद मोफक आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आरोग्य तपासणी, मार्गदर्शन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या तपपूर्ती निमित्त आयोजित या कार्यक्रमातून स्वच्छता, आरोग्य, राष्ट्रसेवा आणि विकास यांचा संगम साधत केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी उपक्रमांचा गौरव करण्यात आला.

Trending

Exit mobile version