गोवा खबर

१५ जूनपर्यंत राज्यात समाधानकारक मान्सूनची शक्यता कमी; पेरणीची घाई करू नका : मुख्यमंत्री फडणवीस

Published

on

Spread the love

गोवा खबर : महाराष्ट्रात मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला तरी १५ जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात समाधानकारक पावसाची शक्यता कमी असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. हवामान विभागाच्या सध्याच्या अंदाजानुसार मान्सूनच्या प्रगतीचा वेग पुढील काही दिवस मंदावण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांत ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यभर पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता असल्याने व्यापक स्वरूपात पावसाची अपेक्षा नाही.

हवामान अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरणासह मेघगर्जना आणि वादळी पावसाच्या सरी पडू शकतात. मात्र हा पाऊस सर्वत्र पेरणीस पोषक ठरेल, अशी स्थिती अद्याप निर्माण झालेली नाही.

दरम्यान, १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि खानदेशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहू शकते, तर मराठवाड्यात तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकरी आणि नागरिकांना सावधगिरीचा इशारा देत आगामी वादळी पावसाच्या आधारे पेरणीची घाई करू नये, असे आवाहन केले आहे. तसेच विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली किंवा वीज खांब, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

मान्सूनच्या पुढील वाटचालीवर हवामान तज्ज्ञांचे लक्ष असून, १५ जूननंतर पावसाच्या परिस्थितीत बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Trending

Exit mobile version