गोवा खबर

एसटी आरक्षण अंमलबजावणी व्हावी

Published

on

Spread the love

भाजपची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी

गोवा खबर : आगामी २०२७ च्या सुरुवातीला होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी अनुसूचित जमाती (एसटी) समाजासाठी विधानसभा आरक्षणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे. यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ), गोवा यांना सविस्तर निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात सिद्धार्थ कुंकळकर, गोविंद पर्वतकर, भाजप एसटी मोर्चाचे राज्य अध्यक्ष मोहन गावकर, अंजली वेळीप, धाकू मडकईकर व पुंडलिक राऊत देसाई यांची उपस्थिती होती.

निवेदन सादर केल्यानंतर माहिती देताना गोविंद पर्वतकर यांनी सांगितले की, राज्यातील एसटी समाज हा लोकसंख्येचा एक मुख्य घटक असूनही ४० सदस्यीय विधानसभेत त्यांना अद्याप आरक्षित प्रतिनिधित्व मिळालेले नाही. या ऐतिहासिक मागणीला न्याय देण्यासाठी राज्य विधानसभेतील अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाच्या पुनर्रचनेसंदर्भातील विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळून त्याची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. मात्र, या प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी केंद्र सरकारकडून ‘अपॉइंटेड डेट’ जाहीर होणे आवश्यक आहे, ज्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना आणि सीमांकन प्रक्रिया सुरू होईल. विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने आणि आचारसंहिता लागू होण्यास मर्यादित कालावधी उरल्याने ही प्रक्रिया वेगाने राबविण्याची गरज आहे. केंद्रीय गृह मंत्रालय आणि भारत निवडणूक आयोगाशी सक्रिय समन्वय साधून ‘अपॉइंटेड डेट’ जाहीर करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, तसेच एसटी समाजाशी संबंधित जनगणना आकडेवारी, स्थानिक लोकसंख्या नोंदी आणि मतदारसंघनिहाय माहिती आगाऊ संकलित करून ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे २०२७ पूर्वी सामाजिक न्यायाची दिशा अधिक बळकट होईल.

Trending

Exit mobile version