गोवा खबर

म्हार्दोळ येथे राज्यस्तरीय मंदिर परिषद; मंदिरांवरील आघात रोखण्यासाठी मंदिर संघटनाची गरज

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोमंतक मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने म्हार्दोळ येथे राज्यस्तरीय मंदिर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी मंदिरांच्या रक्षणासाठी आणि त्यांच्यावरील आघात रोखण्यासाठी सर्व मंदिर विश्वस्तांनी व प्रतिनिधींनी संघटित होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

आज मंदिर प्रतिनिधींनी आपले दायित्व समजून घेण्याची गरज असून पूर्वजांनी ज्याप्रमाणे प्राणपणाने लढून येथील मूर्ती आणि मंदिरांचे रक्षण केले, तो इतिहास विसरून चालणार नाही. महाराष्ट्रात येऊ घातलेल्या एका कायद्यामुळे मंदिरांची भूमी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला असून देवाच्या नावावर असलेली जमीन काढून घेण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही, त्यामुळे अशा कायद्यांविरोधात मंदिर महासंघ सातत्याने लढत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

या परिषदेचा प्रारंभ शंखनाद करून आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला, तर पुरोहित दामोदर वझे यांनी वेदमंत्रपठन केले. सनातन संस्थेचे संस्थापक जयंत बाळाजी आठवले आणि तपोभूमीचे पिठाधिपती ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी परिषदेसाठी पाठवलेल्या संदेशांचे यावेळी वाचन करण्यात आले. देव, देश आणि धर्म रक्षणासाठी कार्यरत असलेल्या म्हापसा येथील ‘हिंदु युवा शक्ती’च्या कार्याचा या परिषदेत विशेष गौरव करण्यात आला. याशिवाय राजीव कुडके यांनी जुने गोवे येथील भव्य गोवेश्वर मंदिराची माहिती दिली. गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी यांनी महासंघाच्या कार्याचा आढावा घेताना मंदिरातून धार्मिक शक्ती जागृत होण्याची आवश्यकता व्यक्त केली, तसेच गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा करणे, गणेशोत्सवाला राज्यस्तरीय धार्मिक उत्सवाची मान्यता देणे आणि मंदिरांच्या परिसरात मद्यविक्रीवर बंदी घालणे अशा महासंघाच्या प्रमुख मागण्या असल्याचे सांगितले.

परिषदेत सुहास वझे यांनी भक्तांना मंदिराशी जोडण्याबाबत मार्गदर्शन केले, तर नंदकुमार जाधव यांनी मंदिर विश्वस्तांसाठी साधना आणि शास्त्र समजून दर्शन घेण्याचे महत्त्व सांगितले. शुभा सावंत यांनी मंदिरे ही धर्मप्रसाराचे केंद्र कशी बनू शकतात यावर प्रकाश टाकला. सायंकाळच्या सत्रात उच्च न्यायालयाचे अधिवक्ता संतोष रिवणकर आणि अधिवक्ता सुनील सिरसाट यांनी मंदिर विश्वस्तांना येणाऱ्या कायदेशीर अडचणींवर मार्गदर्शन करत त्यांच्या शंकांचे निरसन केले. या सत्रात मंदिरांना धर्मशिक्षणाचे केंद्र बनवणे आणि मंदिर महासंघाच्या संघटनात्मक दिशेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या राज्यस्तरीय मंदिर परिषदेच्या समारोपप्रसंगी मंदिरांच्या रक्षणासाठी अनेक महत्त्वाचे ठराव एकमताने संमत करण्यात आले. यामध्ये मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी त्यांच्या शंभर मीटर परिसरात मद्य आणि मांस विक्री केंद्रांवर पूर्णपणे बंदी आणणे, मद्यालयांना हिंदु देवतांची नावे देण्यास प्रतिबंध करणारा कायदा करणे, आणि पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्यासाठी सरकारने पुढाकार घेणे अशा मागण्यांचा समावेश आहे. यासोबतच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देणे, धर्मांतरविरोधी कायदा पारित करणे, जत्रोत्सवाच्या वेळी मंदिर परिसरात अन्य धर्मीयांना स्टॉल लावण्यास बंदी घालणे, मंदिर समित्यांमध्ये महिलांना प्रतिनिधित्व देणे, मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे आणि धार्मिक उत्सवांमध्ये धर्महानी करणारे कार्यक्रम टाळणे अशा ठरावांना मंजुरी देण्यात आली.

या परिषदेच्या माध्यमातून अत्यंत सकारात्मक फलनिष्पत्ती समोर आली आहे. परिषदेत सहभागी झालेल्यांपैकी एकूण एकोणचाळीस मंदिरांनी आपल्या परिसरात वस्त्रसंहिता लागू करण्याचे निश्चित केले असून एकोणतीस मंदिरांनी तालुकास्तरावर नियमित बैठका घेण्याचे ठरवले आहे. तसेच तीस मंदिरांमध्ये धर्मशिक्षणाचे फलक लावण्यात येणार असून सव्वीस मंदिरांमध्ये धर्मजागृतीपर व्याख्याने आयोजित केली जातील. याशिवाय अठ्ठावीस मंदिरांमध्ये धर्मशिक्षण वर्ग आणि एकवीस मंदिरांमध्ये सामूहिक आरती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून उपस्थित सर्वांनीच मंदिराच्या शंभर मीटर परिसरात चालणारी मद्य व मांस विक्री बंद करण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करण्याचा संकल्प केला आहे. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन रोहन देसाई आणि गौरी नायक यांनी केले.

Trending

Exit mobile version