गोवा खबर : माजी आमदार मिक्की पाशेको यांनी काँग्रेसचे नेते दिनेश गुंडू राव यांच्यावर 2022 विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे तिकीट देण्याच्या बदल्यात पक्ष निधीच्या नावाखाली पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पाशेको यांनी दावा केला की, ही चर्चा होत असताना गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे (GPCC) अध्यक्ष गिरीश चोडणकर हे देखील उपस्थित होते. या प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी गिरीश चोडणकर हे GPCC अध्यक्षपदी असताना आपण काँग्रेसला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले.
तसेच राज्यातील सध्याच्या सरकारविरोधात लढण्यासाठी तिसरी आघाडी उभी करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची घोषणाही मिक्की पाशेको यांनी केली.
या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून काँग्रेसकडून याबाबत कोणती प्रतिक्रिया दिली जाते याकडे लक्ष लागले आहे.