गोवा खबर : पणजी: सध्या आपण पूर्व-मान्सून (Pre-monsoon) कडून मान्सूनच्या टप्प्याकडे जात असून हा एक बदलाचा काळ (Transition state) आहे. यामुळे सध्या वातावरणात मोठे बदल जाणवत आहेत, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे (IMD) वैज्ञानिक आणि प्रमुख नहुष प्रकाश कुलकर्णी यांनी दिली.
वाढत्या उकाड्याचे कारण आणि सद्यस्थिती
सध्या गोव्यात सकाळच्या वेळी नैऋत्येकडून (South-Westerly) तर संध्याकाळच्या वेळी पूर्वेकडून (Easterly) वारे वाहत आहेत. मान्सूनच्या आगमनापूर्वी संपूर्ण उपखंडात आर्द्रता (Moisture) खूप वाढली आहे. त्यातच सध्या तापमान 34 ते 35 दरम्यान असल्याने हवामान अतिशय उष्ण आणि दमट झाले आहे. दुपारच्या आणि संध्याकाळच्या वेळी, तसेच रात्रीच्या वेळेस यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात उकाडा व अस्वस्थता (Discomfort) जाणवत आहे. ही स्थिती पुढील १-२ दिवस अशीच राहील.
मान्सून कधी येणार?
१ जून २०२६ पर्यंत केरळमध्ये मान्सूनचे अधिकृत आगमन जाहीर झालेले नाही. मात्र, पुढील ३ ते ४ दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमधील आगमनाची निश्चित तारीख हवामान विभागाच्या बुलेटिनद्वारे लवकरच जाहीर केली जाईल. त्यानंतर गोव्यातही पावसाचा जोर हळूहळू वाढेल.
३ आणि ४ जून रोजी ‘यलो अलर्ट’
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (१ जून) आणि उद्या (२ जून) गोव्यात ‘ग्रीन अलर्ट’ असेल. मात्र, ३ आणि ४ जून रोजी गोव्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस (Thunderstorm with lightning)होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने गोव्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
पुढील ३ दिवसांनंतर गोव्यात पावसाच्या हालचाली अधिक वाढतील आणि मान्सून सक्रिय झाल्यानंतर सध्या जाणवणाऱ्या असह्य उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळेल.